बातम्या

एसटी प्रवास सवलतीत लवकरच ऐतिहासिक बदल होणार

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) पत्रकारांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्याचा संकेत दिला आहे. लालपरीने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आतापर्यंत महिलांना ५०% सवलत, ज्येष्ठ नागरिकांना १००% मोफत प्रवास आणि विद्यार्थ्यांसाठी विविध रियायती योजना लागू करण्यात आल्या आहेत. या सवलतींच्या यादीत आता पत्रकारांसाठी आणखी मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत पत्रकारांसाठीच्या प्रवास सवलती अधिक व्यापक करण्याचा स्पष्ट संकेत दिला. त्यामुळे राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटी प्रवासात आणखी सवलती व सुविधा उपलब्ध होणार आहेत.

८,००० किमी मर्यादा हटणार

सध्या पत्रकारांना साधी, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत मिळते, परंतु यावर ८,००० किलोमीटरची वार्षिक मर्यादा लागू आहे. ही मर्यादा लवकरच रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाईल, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. पत्रकारांकडून ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने केली जात होती.

सर्व एसटी सेवा मोफत!

सर्व प्रकारच्या एसटी बसेसमधून – अगदी शिवशाही बससह – पत्रकारांना मोफत प्रवासाची सवलत लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना कोणत्याही मार्गावर, कोणत्याही प्रवासी सेवांचा लाभ घेता येणार आहे.

ग्रामीण पत्रकारांना मोठा दिलासा

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुर्गम भागांमध्ये रिपोर्टिंगसाठी एसटीचाच पर्याय उपलब्ध असतो. ही सवलत अधिक व्यापक झाल्यास पत्रकारांचे कार्य अधिक सुलभ, वेळेत आणि कार्यक्षम होईल.

ऑनलाइन आरक्षण सुविधा लवकरच

सध्या पत्रकारांसाठी ऑनलाइन आरक्षणाची सुविधा उपलब्ध नाही. मात्र, ही तांत्रिक अडचण दूर करत MSRTC लवकरच ऑनलाईन आरक्षण प्रणाली सुरू करणार आहे. ही सुविधा पुढील महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असून, त्यामुळे पत्रकारांना प्रवासाचे पूर्वनियोजन करता येईल, आणि त्यांचा वेळही वाचणार आहे.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. त्यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी लक्षात घेता, त्यांना देण्यात येणाऱ्या एसटी सवलती अधिक व्यापक होणे हे काळाची गरज होती. MSRTC च्या या निर्णयामुळे राज्यभरातील पत्रकारांच्या कार्यक्षमतेत मोठी भर पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!