बातम्या

वनपालाकडून ८ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाची कारवाई

(जळगाव) : शेतकऱ्यांकडून सागाच्या झाडांची खरेदी करण्यासाठी लागणारी परवानगी मिळवून देण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वनपालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई मंगळवारी (दि. २ जुलै) पारोळा तालुक्यात केली.

तक्रारदार हे पारोळा तालुक्यातील रहिवासी असून, सागाच्या झाडांची खरेदी-विक्री यांचा व्यवसाय करतात. त्यांनी इंधवे गावातील एका शेतकऱ्याशी सागाची झाडं तोडण्यासाठी ६०,००० रुपयांची रक्कम ठरवून सौदा केला होता. झाडं तोडण्यासाठी उपवन विभाग पारोळा येथून परवानगी घेणे आवश्यक असल्यामुळे शेतकऱ्याने तक्रारदारांना अधिकृत पत्र दिले होते. सदर परवानगी मिळवून देण्यासाठी वनपाल दिलीप भाईदास पाटील (रा. देवपूर, धुळे, सध्या मोडाळा, ता. पारोळा) यांनी तक्रारदाराकडे आठ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

सदर तक्रार दि. १९ जून २०२५ रोजी लाचलुचपत विभागाकडे प्राप्त झाली. त्यानुसार त्याच दिवशी पडताळणी करत आरोपी क्र. १ दिलीप पाटील यांनी लाच मागणीची कबुली दिली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी (दि. २ जुलै) पारोळा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात तक्रारदाराकडून आरोपी क्र. १ च्या सांगण्यानुसार त्यांच्यासह कार्यरत असलेल्या वनपाल वैशाली गायकवाड (रा. चोरवड, ता. पारोळा) यांनी पंचासमक्ष ८ हजार रुपये लाच स्वीकारली. त्यावेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने तिला रंगेहाथ पकडले.

या कारवाईत आरोपींकडून मोबाईल जप्त करण्यात आले असून हॅश व्हॅल्यूही घेण्यात आली आहे. आरोपी क्र. १ व क्र. २ यांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपी वैशाली गायकवाड हिला नोटीस देऊन मुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर (ला.प्र.वि. जळगाव) यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सफौ सुरेश पाटील, मपोहेकॉ शैला धनगर, पोहेकॉ किशोर महाजन, पोकॉ राकेश दुसाने व पोकॉ अमोल सूर्यवंशी यांचा समावेश होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. भारत तांगडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मा. माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आरोपींचे सक्षम अधिकारी मुख्य वनसंरक्षक, धुळे हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!