रिधुर-नांद्रा-चांदसर रस्त्यावरील नव्या पुलाचे भव्य लोकार्पण; विदगावमध्ये ७५० महिलांना भांडे संच वाटप

जळगाव, दि. ५ जुलै:
रिधुर-नांद्रा-चांदसर-कवठळ मार्गावरील नागरिकांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली आहे. पावसाळ्यातील दळणवळणाच्या अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्या अर्थसंकल्पातून मंजूर झालेल्या २ कोटी ९ लाख रुपयांच्या निधीतून नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे भव्य लोकार्पण जल्लोषात पार पडले.
या लोकार्पण समारंभाला महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
36 हजारांची लाच घेताना दोघे जेरबंद
पुलाचे उद्घाटन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “हा पूल केवळ रस्ता जोडणारा नाही, तर या भागातील नागरिकांसाठी एक नवसंजीवनी आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला, रुग्ण आणि सामान्य ग्रामस्थांना विशेषतः पावसाळ्यात जाणवणाऱ्या अडचणींवर हा पूल मोठा उपाय ठरेल. आजपर्यंतच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.”
या पुलामुळे विशेषतः रिधुर, नांद्रा, चांदसर, कवठळ आणि आसपासच्या गावांना शेती, बाजारपेठ, शाळा, दवाखाने आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी सहजता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका आता कमी होणार आहे.
विदगावमध्ये महिलांसाठी विशेष उपक्रम
लोकार्पण सोहळ्यापूर्वी विदगाव येथे आयोजित कार्यक्रमात ७५० कामगार महिलांना भांडे संचाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्री पाटील म्हणाले, “महिलांच्या कष्टाला मान्यता देणे, हे समाजाचे कर्तव्य आहे. भांडे संच हे केवळ वस्तू नाही, तर त्यांच्या श्रमाचा सन्मान आहे. शासन आणि समाज महिलांच्या पाठीशी उभे आहे.”
महिलांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शासनाचे आणि पालकमंत्र्यांचे आभार मानले. ग्रामीण भागातील महिलांना थेट सशक्तीकरणाचा हा उपक्रम ठरला आहे.
कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. ललिताताई जनाआप्पा कोळी यांनी केले. सूत्रसंचालन श्री. राजू कोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. जनाआप्पा कोळी यांनी मानले.
या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख श्री. शिवराज पाटील, सभापती श्री. जनाआप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील, श्री. तुषार महाजन, श्री. जितू पाटील, सरपंच श्री. चुडामन कोळी, उपसरपंच श्री. राजू कोळी, श्री. महेंद्र कोळी, श्री. मुरलीधर कोळी, श्री. ज्ञानेश्वर कोळी, श्री. निलेश कोळी, श्री. गजानन सोनवणे, श्री. शालिक पाटील, श्री. सुनील पाटील, श्री. देवेंद्र कोळी, श्री. भगवान कुंभार, श्री. बळीराम कोळी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद
या कार्यक्रमाला विदगाव, नांद्रा, रिधुर, कानळदा व परिसरातील शेकडो शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक स्तरावर या पुलामुळे विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.