गिरीश महाजन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
नवी दिल्ली :नुकत्याच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात महाराष्ट्रामध्ये महायुतीला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडे मागणी केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून यासंदर्भात चर्चा देखील केली केली असून राजीनामा देण्यावर ते ठाम असल्याची माहिती मिळत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी नेमकी कुणाला मिळेल अशा चर्चां राज्यात रंगू लागल्या असताना भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस नंतर दुसऱ्या स्थानी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्राचे संकट मोचक म्हणून त्यांनी पक्षाच्या अनेक संकट काळात पक्षाला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळावी अशी चर्चा सध्या जळगाव जिल्ह्यात सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वरिष्ठांची भेट घेतली आहे. नेमके आता दिल्लीवरून आल्यावर ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देत फक्त पक्ष संघटनाकडे लक्ष दिले तर त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची माळ ही मंत्री गिरीश महाजन यांच्या गळ्यात पडू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.