राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना – “जळगाव पॅटर्न”चा राज्यभर अंमल
जळगाव जिल्ह्याचा प्रयोग ठरला राज्याचा पॅटर्न – शिक्षण क्षेत्रात नवा इतिहास

जळगाव : (दि. ३ ऑक्टोबर २०२५) राज्याच्या शालेय शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक ठरणारा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेशी असलेले भावनिक नाते अधिक दृढ होणार असून, माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळांच्या विकासात नवे पर्व सुरू होणार आहे. शाळांच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान ठळक व्हावे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि सामाजिक बांधिलकी जोपासली जावी या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
“जळगाव पॅटर्न”ची राज्यभर झळाळी
या निर्णयामागची प्रेरणा जळगाव जिल्ह्यातील यशस्वी प्रयोगातून मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ही संकल्पना मांडली होती.
आज जळगाव जिल्ह्यात २० हून अधिक माजी विद्यार्थी संघ सक्रियपणे कार्यरत असून, त्यांच्या उपक्रमांमुळे शाळांमध्ये भौतिक सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक वातावरणात लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. या आदर्श प्रयोगाला “जळगाव पॅटर्न” म्हणून ओळख मिळाली असून आता तो संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे.
माजी विद्यार्थी संघाची रचना
शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार –
-
प्रत्येक शाळेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक/प्राचार्य सचिव म्हणून कार्य करतील.
-
एक पालक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी व शिक्षक सल्लागार सदस्य म्हणून सहभागी होतील.
-
वर्षातून किमान एक माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहसंमेलन आयोजित करणे बंधनकारक असेल.
-
हे मेळावे गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, ईद, ख्रिसमस यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केले जातील.
उपक्रम व जबाबदाऱ्या
या संघाच्या माध्यमातून पुढील उपक्रम राबविण्यात येतील –
-
माजी विद्यार्थी शाळेच्या भौतिक सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करतील.
-
विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, शिष्यवृत्ती, नोकरीविषयक माहिती व प्रेरणा कार्यक्रम आयोजित केले जातील.
-
पर्यावरणपूरक उपक्रम जसे की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, प्लास्टिकमुक्त शाळा राबविण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
-
शिक्षकांचा सन्मान व गौरव सोहळा आयोजित करण्यात येईल.
डिजिटल नोंदणी व अहवाल प्रणाली
राज्य सरकारने या उपक्रमासाठी विशेष ऑनलाइन नोंदणी प्रणाली तयार केली आहे.
-
प्रत्येक माजी विद्यार्थ्याची नोंदणी या पोर्टलवर करावी लागेल.
-
शाळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे फोटो, अहवाल व यशोगाथा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य असेल.
शिक्षण क्षेत्रातील नवा आदर्श
या निर्णयामुळे माजी विद्यार्थ्यांची ऊर्जा, कौशल्य व अनुभव शाळांच्या प्रगतीसाठी उपयोगात येणार आहे. राज्यभरात “जळगाव पॅटर्न” अंमलात आणल्यामुळे शिक्षण क्षेत्रात सामूहिक सहभागाचा आदर्श निर्माण झाला आहे.
शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय केवळ शाळांच्या प्रगतीपुरता मर्यादित नसून, समाजातील प्रत्येक घटकाला शाळेशी जोडणारा एक सामाजिक उपक्रम ठरणार आहे.