ACB ची मोठी कारवाई – 36 हजारांची लाच घेताना दोघे जेरबंद

धुळे: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे युनिटने रावेर तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयातील मुख्याध्यापिका आणि कनिष्ठ लिपिक यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे. शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून, शाळेतील उपशिक्षिकेच्या प्रसूती रजेच्या मंजुरीसाठी तब्बल ₹36,000/- ची लाच मागितल्याचे समोर आले आहे.
✅ घटनेचा तपशील
तक्रारदार (वय 61 वर्षे) यांच्या सुनेने, जी धनाजी नाना विद्यालय, खिरोदा येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे, प्रसूती रजा मंजुरीसाठी दि. 02 जून 2025 रोजी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला होता. मात्र, मुख्याध्यापिका सौ. मनीषा पितांबर महाजन (वय 57 वर्षे) यांनी रजा मंजुरीसाठी तोंडी लाच मागणी केली होती. तक्रारदारांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिकांची भेट घेतली असता त्यांनी प्रति महिना ₹5,000/- प्रमाणे सहा महिन्यांसाठी ₹30,000/- ची मागणी केली.
त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. यानंतर दि. 07 जुलै 2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपी महाजन यांनी रकमेची वाढ करत प्रति महिना ₹6,000/- प्रमाणे एकूण ₹36,000/- ची मागणी केली.
✅ सापळा कारवाई आणि अटकेची कारवाई
लाचलुचपत विभागाने त्वरित सापळा रचत दि. 07 जुलै 2025 रोजी आरोपींना रंगेहात पकडले. तक्रारदारांकडून लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर मुख्याध्यापिका सौ. महाजन यांनी ती कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (वय 27 वर्षे) यांच्याकडे मोजण्यास दिली. त्यावेळी आरोपी क्रमांक 2 हा रक्कम मोजत असताना दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
✅ आरोपींची माहिती
▪️ सौ. मनीषा पितांबर महाजन, मुख्याध्यापिका, जनता शिक्षण मंडळ, धनाजी नाना विद्यालय, खिरोदा, रा. चिनावल रोड, खिरोदा, ता. रावेर, जि. जळगाव.
▪️ आशिष यशवंत पाटील, कनिष्ठ लिपिक, जनता शिक्षण मंडळ, धनाजी नाना विद्यालय, खिरोदा, ता. रावेर, जि. जळगाव.
✅ संपत्ती व मोबाईल झडती
सापळा कारवाईनंतर आरोपींच्या घरी झडती घेण्यात आली असून मोबाईल ताब्यात घेऊन त्याचा तपास सुरू आहे. आरोपींचा मोबाईल तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे आणि त्यातील डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. संबंधित गुन्ह्याचे साक्षीपुरावे म्हणून हॅश व्हॅल्यू देखील घेण्यात आले आहे.
✅ संपूर्ण कारवाईत सहभागी अधिकारी व पथक
▪️ सापळा व तपासी अधिकारी: श्री. सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धुळे
▪️ मार्गदर्शक अधिकारी: मा. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परीक्षेत्र आणि मा. माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, नाशिक परीक्षेत्र.
▪️ सापळा पथक: पो.नि. रूपाली खांडवी, पो.हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, पावरा, रामदास बारेला, मोरे, बडगुजर – सर्व ला.प्र.वि. धुळे युनिट.
✅ सक्षम अधिकारी:
या प्रकरणात पुढील कार्यवाही करण्याचे अधिकार शिक्षण संचालक (माध्यमिक), पुणे यांच्याकडे आहेत.
✅ आरोपींविरोधात कठोर कारवाईचा इशारा
शिक्षण क्षेत्रात असलेल्या व्यक्तींनी भ्रष्ट मार्गाने काम केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे. यापुढील काळात अशा स्वरूपाचे प्रकरण समोर आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.