बातम्या

कु. चार्वी विक्रम रंधे हिचे दहावीत ९५.२०% गुणांसह घवघवीत यश;

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम हायस्कूल या नामांकित शाळेची विद्यार्थिनी कु. चार्वी विक्रम रंधे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये तब्बल ९५.२०% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शाळा, पालकवर्ग, शिक्षकगण आणि मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून चार्वीवर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.

चार्वी ही केवळ अभ्यासातच नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रातही समानपणे सक्रीय आणि उल्लेखनीय कामगिरी करणारी विद्यार्थीनी आहे. शालेय जीवनात उत्तुंग शैक्षणिक प्रगती साधतानाच तिने विविध नामांकित आणि प्रख्यात डान्स रिअ‍ॅलिटी शोजमध्ये आपल्या नृत्यकलेची चमक दाखवत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सूपर डान्सर, सूपर डान्सर महाराष्ट्र, डान्स दिवाने जूनियर, डान्स महाराष्ट्र डान्स, मी होणार सुपरस्टार तसेच HDFC Life YoungStar या देशपातळीवरील आणि राज्यपातळीवरील विविध डान्स रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमध्ये चार्वीने यशस्वी सहभाग नोंदवून तिच्या प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्यामुळे परीक्षकांकडूनही तिला विशेष गौरव व प्रशंसा मिळाली आहे.

चार्वीचे वडील श्री. विक्रम रंधे हे सार्वजनिक बांधकाम विभागात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असून आपल्या मुलीच्या या बहुआयामी यशामुळे त्यांच्या कार्यालयातही आनंदाचे वातावरण आहे. सहकाऱ्यांकडून आणि वरीष्ठांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चार्वीचा अभ्यास, नृत्यकौशल्य आणि आत्मविश्वास यांचा संगम इतर विद्यार्थ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायक आहे. तिच्या यशामध्ये तिच्या कुटुंबाचे, शिक्षकांचे आणि गुरूजनांचे मोठे योगदान असून ती भविष्यात शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात आणखी उंच भरारी घेईल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी शाळेमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, अनेकांकडून तिच्या प्रगतीला शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!