बातम्या

जळगाव विमानतळ, भुसावळ रेल्वे विभागाला अलर्ट! QRT फोर्स सज्ज, ड्रोन बंदी, सुट्या रद्द

जळगाव | प्रतिनिधी – भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. या निर्देशानुसार जळगाव विमानतळ आणि भुसावळ रेल्वे विभागाला उच्चस्तरीय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगाव विमानतळावर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली असून, शीघ्र कृती दल (QRT) सक्रिय करण्यात आले आहे. यंत्रणा सज्ज ठेवत, ड्रोन उडविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, विमानतळ परिसरात कसून तपासणी सुरू आहे.

QRT बी टीमचा ताफा सज्ज

या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळावर सुरक्षा यंत्रणांची बैठक पार पडली. यामध्ये QRT (Quick Response Team) बी टीम सक्रिय करण्यात आली असून, खालील जवान सज्ज आहेत:

  1. समीर पठाण
  2. आशुतोष चरापले
  3. अविनाश राजपूत
  4. राहुल मोरे
  5. सूरज खडसे
  6. शाहरुख पठाण

प्रत्येक हालचालीवर नजर

विमानतळ परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात असून, अनधिकृत व अनोळखी व्यक्तींना प्रवेश नाकारला जात आहे. नागरिकांनी विमानतळ परिसरात विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भुसावळ रेल्वे विभागही अलर्टवर

दरम्यान, भुसावळ रेल्वे विभागातील सुरक्षेचाही आढावा घेण्यात आला आहे. प्रवाशांची तपासणी, सीसीटीव्ही मॉनिटरिंग आणि पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

जळगाव विमानतळ संचालक हर्षकुमार त्रिपाठी यांच्या उपस्थितीत ही सुरक्षा आढावा बैठक पार पडली. प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!