उन्हात लहान मुले उभी, परीक्षा सुरू – तरीही एस.टी. ड्रायव्हरचा मुजोरपणा!

जळगाव (प्रतिनिधी) – MH 40-4-5198 या क्रमांकाची भादली वरून आसोदा मार्गावर धावणारी एस.टी. बस विद्यार्थ्यांचा विचार न करता थांबलीच नाही!आज सकाळी भादलीहून जळगावकडे जाणारी एस.टी. बस (MH 40-4-5198) ही विद्यार्थ्यांसाठी ठरलेल्या आसोदा बस स्टॉपवर थांबलीच नाही. बसचा ड्रायव्हर विद्यार्थ्यांनी थांबवण्याच्या खुणा केल्यावरही गाडी थांबवून न देता थेट पुढे निघून गेला. अखेर खंडेराव मंदिराजवळ जाऊनच गाडी थांबवण्यात आली.
तिथवर विद्यार्थी धावत गेले आणि गाडीत बसण्यासाठी विनवणी केली. “आमची परीक्षा सुरू आहे, आम्हाला उशीर होतो आहे, कृपया गाडीत बसू द्या” असे सांगूनही संबंधित चालकाने विद्यार्थ्यांना गाडीत बसण्यास नकार दिला. या मुजोरपणामुळे उन्हात उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले.
या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच तुषार भाऊ महाजन यांनी विद्यार्थ्यांची बाजू घेत, त्वरित जळगाव एस.टी. आगारात जाऊन सदर चालकाविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे.
एस.टी. महामंडळाकडे ठोस कारवाईची मागणी
विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात अशी निष्काळजी वृत्ती अत्यंत निषेधार्ह आहे. लहान मुले उन्हात उभी असूनही गाडी न थांबवणे, विनंती करूनही गाडीत न घेणे हे गंभीर दुर्लक्ष आहे. अशा बेजबाबदार चालकावर तात्काळ योग्य ती कारवाई करून इतर चालकांना योग्य दिशा दाखवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व पालकवर्गाकडून केली जात आहे.