CCTV मध्ये कैद! पुण्यातील चोरट्यांची टोळी जळगाव पोलिसांच्या जाळ्यात!

जळगाव/प्रतिनिधी (दि. 28 जून 2025)
जळगाव शहरातील गोंविदा रिक्षा स्टॉप परिसरात महेंद्र पिकअप वाहनाचे दरवाजाचे कुलूप तोडून तब्बल 4 लाख 2 हजार 75 रुपये किंमतीच्या सिगारेट चोरीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात CCTNS क्र. 261/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोउनि. श्री. शरद वागल यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्र. 05 (पोहेकॉ प्रविण भालेराव, पोहेकॉ मुरलीधर धनगर, पोहेकॉ सिध्देश्वर डापकर, चापोकॉ महेश सोमवंशी) ने घटनास्थळी असलेले CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण करून तपासाची चक्रे फिरवली. त्यामध्ये संशयित सागर राजू घोडके (वय 28, रा. विद्यानगर झोपडपट्टी, चिंचवड, पुणे) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पथकाने सांगवी पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड परिसरात पाठलाग करून सागर घोडके यास पुण्यातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्यात आपली कबुली दिली असून त्याच्यासोबत अभिजित ऊर्फ कुबडया तुळशिदास विटकर (वय 25), काशिद अलिमुद्दीन अन्सारी (वय 22), आकाश ऊर्फ चंटी भवरसिंग राजपूत (वय 23) या तिघांनी मिळून चोरी केल्याचे उघड झाले. चोरी केलेली सिगारेट पुण्यात स्थानिक नागरिकांना विकल्याची कबुलीही दिली आहे.
तपासादरम्यान आरोपींकडून 3 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली, जी चोरी केलेल्या सिगारेट विक्रीतून मिळाली होती. सदर गुन्ह्यात आरोपी नं. 01 ते 03 यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
कारवाई करणारे अधिकारी:
या कारवाईत . श्री. शरद बागल, पोहेकों/प्रविण भालेराव, पोहेकॉ/मुरलीधर धनगर, पोहेकों/सिध्देश्वर डापकर, चापोकॉ महेश सोमवंशी