जळगाव सी.ए. शाखेच्या अध्यक्षपदी सी.ए. हितेश आगीवाल यांची निवड

जळगाव : भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या (ICAI) जळगाव शाखेचा पद हस्तांतरण सोहळा शनिवार, दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आय.सी.ए.आय. भवन, रिंग रोड येथे उत्साहात पार पडला. माजी अध्यक्ष सी.ए. अभिषेक कोठारी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल यांच्याकडे शाखेचा पदभार सोपविला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील, तसेच केंद्रीय परिषद सदस्य (सी.सी.एम.) सी.ए. पियुष छाजेड, सी.सी.एम. सी.ए. उमेश शर्मा, आणि प्रादेशिक परिषद सदस्य (आर.सी.एम.) सी.ए. पियुष चांडक उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी जाहीर
वर्ष २०२५-२६ साठी जळगाव सी.ए. शाखेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
- अध्यक्ष : सी.ए. हितेश आगीवाल
- उपाध्यक्ष व विद्यार्थी शाखा अध्यक्ष : सी.ए. रोशन रुणवाल
- सचिव : सी.ए. सोहन नेहेते
- कोषाध्यक्ष : सी.ए. लक्ष्मीकांत लाहोटी
- व्यवस्थापन समिती सदस्य : सी.ए. पद्मनाभ काबरा, सी.ए. नचिकेत जाखेटिया
- सहकारी सदस्य : सी.ए. तृप्ती राठी, सी.ए. हितेश जैन
पालकमंत्रींच्या शुभेच्छा व गौरवोद्गार
पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांनी सी.ए. व्यवसायाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत म्हटले की, “डॉक्टरांकडे शरीराचे आरोग्य तपासले जाते, तसेच सी.ए. हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे डॉक्टर असून त्यांच्याशी खोटे बोलता येत नाही. सी.एंनी केलेल्या मेहनतीमुळेच महाराष्ट्राला व देशाला जीएसटीच्या माध्यमातून मोठा महसूल मिळतो.”
त्यांनी माजी अध्यक्ष सी.ए. अभिषेक कोठारी यांच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली व नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
गौरव समारंभ व चर्चासत्र
कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या सी.ए. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३४ विद्यार्थ्यांचा आणि सी.ए. इंटरमिजीएट परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच “जळगाव बॉक्स क्रिकेट लीग २०२४” मध्ये विजेते ठरलेल्या संघांचाही गौरव झाला.
सी.सी.एम. सी.ए. पियुष छाजेड यांनी “कर्टन रेझर – इन्कमटॅक्स बिल २०२५” या विषयावर चर्चासत्र घेतले. त्यांनी सांगितले की, आयकर विभागाने प्राप्तिकर विधेयक २०२५ संदर्भात नवीन ऑनलाइन स्वयं-मदत साधन सुरू केले असून, करदाते आता अधिकृत वेबसाइटवर १९६१ च्या सध्याच्या आयकर कायद्याशी तुलना करू शकतात.
अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल यांचे मनोगत
नवीन अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल यांनी कार्यकाळासाठी “प्रयास” ही थीम घोषित करत, शाखेच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. त्यांनी सांगितले की, “जळगाव सी.ए. शाखा ही पश्चिम विभागातील सर्वाधिक सक्रिय शाखांपैकी एक आहे. या सातत्यपूर्ण यशासाठी संपूर्ण कार्यकारिणी, माजी अध्यक्ष, विद्यार्थी व कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.ए. शिल्पा सेठिया व सी.ए. यश जैन यांनी केले, तर आभार प्रदर्शन सी.ए. सोहन नेहेते यांनी मानले.