वन विभागातील लाचखोरीचा पर्दाफाश : सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ACB ने रंगेहात पकडले!

जळगाव श्री मराठी न्यूज । ६ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक दोन तरी लाचखोरीची बातमी समोर येत असून अशातच शेतकऱ्याला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह लिपिक आणि एका कंत्राटी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. पारोळा येथे झालेल्या या कारवाईमुळे जळगावच्या वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मनोज बबनराव कापुरे (वय ५४ वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, पारोळा (अतिरिक्त कार्यभार – अमळनेर), निलेश मोतीलाल चांदणे (वय ४५): लिपिक, वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, पारोळा, आणि कैलास भरत पाटील (वय २७ कंत्राटी कर्मचारी (चालक) असं लाचखोरांचे नाव असून त्यांना अटक करण्यात आलीय.पाचोरा तालुक्यातील सडावण शिवारातील एका शेतकऱ्याला त्याच्या आणि नातेवाईकांच्या शेतात बांबू लागवड करायची होती. यासाठी ‘अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष लागवड व फुलपीक लागवड’ या शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केले होते. या कामासाठी एकूण चार फाईल्स तयार करण्यात आल्या होत्या.
या कामाचा अतिरिक्त कार्यभार पारोळा येथील सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी (RFO) मनोज बबनराव कापुरे यांच्याकडे होता. तक्रारदार शेतकरी २३ जुलै रोजी त्यांना भेटले असता, कापुरे यांनी प्रत्येक फाईल मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांप्रमाणे एकूण ४० हजार रुपयांची मागणी केली.४० हजारांची मागणी, ३६ हजारांवर तडजोड
लाचेच्या रकमेवरून झालेल्या तडजोडीअंती ३६ हजार रुपये देण्याचे ठरले. यापैकी ३५ हजार रुपये स्वतःसाठी आणि १ हजार रुपये लिपिक निलेश मोतीलाल चांदणे यांच्यासाठी असल्याचे कापुरे यांनी सांगितले. ही रक्कम कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील याच्याकडे देण्यास सांगण्यात आले.