बातम्या

जळगावात पुन्हा लाचखोरी! ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपविभागीय अभियंता जाळ्यात

चार हजाराची लाच घेताना अमळनेरचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

जळगाव/अमळनेर: जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीत. आठवड्यातून किमान एक-दोन तरी लाचखोरीची बातमी समोर येत असतानाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी सायंकाळी धडाकेबाज कारवाई केली. अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप पाटील याला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे जिल्हा परिषद आणि संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप पाटील यांच्याकडे धरणगाव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचाही अतिरिक्त पदभार होता. याच धरणगाव विभागातील एका प्रकरणाच्या मंजुरीसाठी अभियंता पाटील यांनी तक्रारदाराकडे चक्क ४ हजार रुपयांची लाच मागितली होती.पाटील यांनी केलेल्या या मागणीमुळे तक्रारदाराने तातडीने लाच देण्यास नकार दिला आणि थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची शहानिशा होताच, नंदुरबार आणि जळगाव विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) संयुक्तपणे सापळा रचण्याची योजना आखली. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सापळा कार्यवाही करण्यात आली तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन अभियंता दिलीप पाटील यांच्याकडे गेला असता, त्यांनी ती स्वीकारली. नेमक्या याच वेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने उपविभागीय अभियंता दिलीप पाटील याला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

जिल्ह्यात वारंवार होत असलेल्या लाचखोरीच्या घटनांमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याला एसीबीने पकडल्याने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाचलुचपत विभागाच्या या धडक कारवाईचे सामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे.पुढील तपास: दिलीप पाटील यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एसीबीचे पथक या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!