जळगावात मोठा खुलासा! गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसेसह दोघांना अटक

जळगाव, प्रतिनिधी :शहरातील शनिपेठ पोलिसांनी अवैध शस्त्र विक्रीच्या कारभाराचा मोठा पर्दाफाश केला असून, या कारवाईत गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसेसह दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ज्ञानदेवनगर ते काशिनाथनगर रोडवरील परिसरात करण्यात आली.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, राकेश दिलीप भावसार (वय ४१, रा. सदाशिवनगर) हा एक गावठी कट्टा घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे समजले. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. शनिवारी सकाळी सुमारे ११:४५ वाजता पोलिसांनी ज्ञानदेवनगर ते काशिनाथनगर रोडवर सापळा रचून राकेश भावसारला अटक केली.
झडती घेतली असता, राकेशच्या कमरेला लपवलेला एक गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसे सापडली. त्यानंतर त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत राकेश भावसारने ६ एप्रिल २०२५ रोजी प्रसाद संजय महाजन (वय २८, रा. ज्ञानदेवनगर) याच्याकडून ५४,००० रुपये रोख रकमेने हे शस्त्र खरेदी केल्याची कबुली दिली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ प्रसाद महाजन यालाही अटक केली. चौकशीत दोघांनी संगनमताने अवैध शस्त्राची खरेदी-विक्री केल्याचे उघड झाले आहे. या दोघांविरोधात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या विरोधात पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोहेकॉ युवराज कोळी, रविंद्र बोदवडे, शशिकांत पाटील, अनिल कांबळे आणि पराग दुसाने यांच्या पथकाने केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.