उत्कृष्ट वाहन चालक पुरस्कार – जळगावच्या संदीप पाटील यांना मोठा सन्मान

जळगाव – ‘महसूल सप्ताह २०२५’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागात उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते विविध विभागांतील कार्यक्षम कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विशेषतः अपर जिल्हाधिकारी यांचे वाहन चालक संदीप सुरेश पाटील यांना ‘उत्कृष्ट वाहन चालक’ म्हणून निवडण्यात आले असून, त्यांना महसूल दिनाच्या औचित्याने विशेष सन्मान देण्यात आला.
या कार्यक्रमास राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महसूल सप्ताहाची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि महसूल विभागाची सामाजिक बांधिलकी यावर प्रकाश टाकण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाही महसूल कर्मचाऱ्यांनी जनतेच्या सेवेत उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्याचा गौरव या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टीमचे व विशेषतः महसूल विभागाचे सर्व स्तरांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.