महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना ‘राज्य स्तरीय सेवा गौरव पुरस्कार’ प्रदान

मुंबई : कामगार टाईम्स वृत्तपत्राच्या वतीने दिला जाणारा ‘राज्य स्तरीय सेवा गौरव पुरस्कार’ यंदा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना प्रदान करण्यात आला. पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी ‘दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा’ काढून मांडलेले प्रभावी मुद्दे लक्षात घेऊन त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले.
मुंडे यांनी हा पुरस्कार यात्रेतील सर्व सहकारी पत्रकारांच्या वतीने नम्रपणे स्वीकारला आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील, अशी ग्वाही दिली.
याच कार्यक्रमात मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनाही विशेष सन्मान देण्यात आला.
या समारंभाला पुढारी चे सहाय्यक संपादक चंदन शिरवाळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, कामगार टाईम्सचे संपादक भाऊसाहेब पठाण, तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य आणि देशपातळीवरील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी पत्रकारांच्या समस्यांवर चर्चा केली व त्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढण्याचा संकल्प केला.