बातम्या

पाचोऱ्यातील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास 29 हजाराची लाच स्वीकारताना अटक

आठवड्यातून एक-दोन तरी लाचखोरीची बातमी समोर येत आहे.

जळगाव श्री मराठी न्यूज । १२ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक-दोन तरी लाचखोरीची बातमी समोर येत आहे. अशातच पाचोऱ्यातील वीज कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यास २९ हजाराची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात अटक केली. ही कारवाई आज (१२ ऑगस्ट) दुपारी करण्यात आली. मनोज जगन्नाथ मोरे (वय 38) असं लाचखोर अभियंत्याचे नाव असून या कारवाईने लाचखोर पुरते हादरले आहेत.

तक्रारदार यांचा सोलर फिटिंगचा व्यवसाय असून त्यांनी एकूण ३ प्रकरणे तयार करून ऑनलाईनद्वारे सबमिट केले होते. सदर तीन ही प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी ३००० प्रमाणे एकूण ९००० व यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून दिली आहे. त्याची लाच मागत असल्याने तक्रारदार यांनी ११ ऑगस्ट रोजी जळगावच्या एसीबीकडे तक्रार दिली होती.

पडताळणी दरम्यान लाचखोर मनोज मोरे याने तीन प्रकरणांचे रेग्युलर प्रमाणे ९००० ची मागणी केली तसेच यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढली आहे. त्याचे तुम्ही वन टाइम पेमेंट करत आहात म्हणून २५०० प्रमाणे ७०००० रुपये होतात त्यापैकी तुम्ही ३०००० दिले आहेत उर्वरित ४०००० पैकी पहिल्या हप्त्याचे आज २०००० व चालूच्या ३ प्रकरणांचे ९००० अशी एकूण २९ हजार रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात अटक केली.

विशेष अभियंता मोरे यांनी कार्यालयातच लाच स्वीकारली. याप्रकरणी लाचखोर मनोज मोरे याच्याविरुद्ध भ्र.प्रति.अधि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!