दीपनगर उपकेंद्रावर धक्कादायक चोरी! ₹39,37,500 ची कॉपर वायर गायब

भुसावळ (दि. ३ ऑक्टोबर २०२५) :दीपनगर वीज प्रकल्प परिसरात सुरक्षारक्षकांचा २४ तास गराडा असतानाही १३२/३३ केव्ही उपकेंद्रातून तब्बल ३९ लाख ३७ हजार ५०० रुपयांची कॉपर वायर चोरीला गेली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून “ही केवळ चोरी आहे की विम्याचा लाभ मिळवण्यासाठी रचलेला कट?” असा सवाल निर्माण झाला आहे.
सुरक्षा प्रश्नचिन्हाखाली
दीपनगरसारख्या संवेदनशील वीज प्रकल्प क्षेत्रात सुरक्षा रक्षक २४ तास तैनात असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरी होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. सातत्याने कोट्यवधींच्या चोऱ्या होत असल्या तरी संबंधित विभागाने आतापर्यंत ठोस कारवाई केली नाही, याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये रोष आहे.
फिर्याद आणि प्रकरणाची माहिती
पारेषणचे उपकार्यकारी अभियंता ब्रिजेंद्रकुमार बुद्धसेन पटेल (वय ४२, रा. गुलमोहर प्रेस्टीज, भुसावळ, मूळ रा. रघुराज नगर, जि. सतना, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,
२७ सप्टेंबर २००९ ते २७ मे २०२५ या कालावधीत सकाळी ९.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी जळालेल्या ट्रान्सफार्मरमधून मोठ्या प्रमाणात कॉपर वायर लांबवली. या तारांची किंमत जवळपास ४० लाख रुपयांहून अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांचा तपास
या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपासाची सूत्रे भुसावळ तालुका पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्याकडे आहेत. त्यांनी सांगितले की –
- परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे,
- सुरक्षा रक्षक तैनात असतानाही चोरी कशी झाली, याचा सखोल शोध घेतला जाईल,
- या घटनेच्या मुळाशी जाऊन योग्य ती कडक कारवाई केली जाईल.
ही घटना समोर आल्यानंतर परिसरात चर्चा रंगू लागली आहे.
- “सुरक्षा असताना चोरी झाली तरी आतल्या गोटातील संगनमताशिवाय शक्य नाही” असा संशय व्यक्त केला जात आहे.
- सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे विम्याचा लाभ मिळवण्यासाठी मुद्दाम अशा घटना घडवल्या जात आहेत का? असा संशय निर्माण झाला आहे.
दीपनगर प्रकल्प परिसरातील ही घटना केवळ मोठ्या प्रमाणावरची आर्थिक चोरी नसून सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. पुढील तपासात या कटाचा धागा कुणाकडे येतो आणि पोलिस यंत्रणा किती कठोर पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.