नगररचना विभागातील भ्रष्टाचाराची तक्रार करणार – अमोल कोल्हे
जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेचा नगररचना विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असुन लाच दिल्याशिवाय याठिकाणी कामे होत नाहीत असे आरोप सातत्याने महानगरपालिकेचे तत्कालीन नगरसेवक यांनी महासभेत केलेले आहेत. तसेच सामाजिक संघटनांच्या व नागरिकांच्या वतीने देखील हाच आरोप महानगरपालिकेच्या नगररचना विभागवार केले जातात. छावा मराठा युवा महासंघ हि संघटना देखील नगररचना विभागातील भोंगळ कारभारविरोधात नेहमीच आवाज उचलत आलेली आहे. मागच्याच वर्षी छावा मराठा युवा महासंघातर्फे दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन महानगरपालिकेत विशेषतः नगररचना विभागात एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या होत्या. कालच जळगाव शहर महानगपालिकेच्या नगररचना विभागातील अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे . या पार्श्वभूमीवर छावा मराठा युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी सांगितले की, हि एक दुर्दैवी घटना आहे परंतु यापेक्षाही फार मोठ्या प्रमाणावर नगररचना विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळालेली आहे. सदनिकांची मंजुरी घेतांना कमी उंचीची मंजुरी घेऊन आणि प्रत्यक्षात जागेवर बांधकाम करतांना ईमारतीची उंची मंजुरीपेक्षा जास्त करून मजले वाढविण्यासाठी नगररचना विभागातील अधिकारी यांना लाखो रुपये लाच देऊन कामे उरकली जातात. या संदर्भात लवकरच रिंगरोड वरील एका आर्किटेक्टच्या कोट्यावधीचा भ्रष्टाचारची चौकशी होण्याची मागणी करणार आहे आणि पूराव्यानिशी लवकरच गैरप्रकार उघडकीस आणणार आहे.