बातम्या

अवैध गांजा विक्री करणारा आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव: एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत अवैधरीत्या गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडले आहे. आरोपीकडून तब्बल ९ किलो ५२२ ग्रॅम गांजा आणि होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण १,०७,१३२/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई

एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती मेहरुण बाग परिसरात गांजा विक्रीच्या उद्देशाने मोटारसायकलवर फिरत आहे. त्यांनी ही माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर, पोलीस नाईक योगेश बारी, पोलीस कर्मचारी नितीन ठाकूर, राहुल घेटे आणि योगेश घुगे यांचे एक विशेष पथक तयार करून कारवाईचे नियोजन करण्यात आले.

पथकाने संशयित आरोपीचा शोध घेतला असता शिवाजी महाराज उद्यान (मेहरुण बाग) येथे तो आढळून आला. पोलिसांना पाहताच तो पळण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी चारही बाजूंनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. झडती घेतल्यावर त्याच्याजवळून ९ किलो ५२२ ग्रॅम गांजाची गोणी आणि होंडा युनिकॉर्न मोटारसायकल आढळून आली.

आरोपीवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

संशयिताची ओळख पटवली असता त्याचे नाव मुकेश विष्णु अभंगे (वय ४३, रा. कंजरवाडा, तांबापूर, जळगाव) असे असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी शासकीय पंच, फोटोग्राफर, वजन काटा धारक आणि फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले.

पोलिस नाईक प्रदीप चौधरी यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (ब) ii (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले आणि पोलीस कर्मचारी चेतन पाटील करत आहेत.

वरीष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि नागरिकांना आवाहन

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

एमआयडीसी पोलीस स्टेशनकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणतीही व्यक्ती अवैधरीत्या अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. खबर देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!