नोकरी टिकविण्यासाठी मागितली १० हजाराची लाच, मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

तकारदार हे नागरी एज्युकेशन सोसायटी गर्ल्स हायस्कुल, पारोळा येथे सन २०११ पासुन शिपाई या पदावर कार्यरत आहे. संस्थेचे चेअरमन श्री. मिलींद मिसर यांचे भाऊ गौतम मिसर हे सदर संस्थेच्या बॉईज हायस्कुलमध्ये उप शिक्षक या पदावर कार्यरत होते त्यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाली आहे. श्री. गौतम मिसर यांनी सदर संस्थेत कार्यरत असलेल्या तकारदार यांचेसह सर्व शिपायांना त्यांच्याकडे बोलावुन घेवुन त्या सर्वांना संस्थेच्या चेअरमन पदावर त्यांचे भाऊ मिलींद मिसर यांची नियुक्ती झाली असुन या संस्थेत नोकऱ्या टिकवायच्या असतील तर प्रत्येक शिपायास प्रत्येकी १०,०००/- रूपये जमा करावे लागतील अन्यथा तुम्हाला नोकरीत त्रास होईल असे सांगीतले होते.मुख्याध्यापक गौतम मिसर यांच्या मागणी प्रमाणे तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र. विभाग, धुळे कार्यालयाकडे दि.०९.०२.२०२४ रोजी तकार केली होती.सदर तकारीची दि.१०.०२.२०२४ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रु लाचेची मागणी करुन शाळेतील उप शिक्षक सचिन पाटील यांच्याकडे देण्यास सांगीतले. तसेच दि.१२.०२.२०२४ रोजी सापळा कारवाई आयोजीत केली असता सदर कार्यवाही दरम्यान मुख्याध्यापक गौतम मिसर यांनी सदर लाचेची रक्कम शाळेतील उप शिक्षक धर्मेंद्र शिरोडे यांच्याकडे देण्यास सांगीतले. परंतु तकारदार यांना मुख्याध्यापक गौतम मिसर यांच्या सांगण्याप्रमाणे इतरांकडे लाचेची रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने सदरची कार्यवाही स्थगीत करण्यात आली होती. मुख्याध्यापक गौतम मिसर यांनी तकारदार यांच्याकडे दि.१०.०२.२०२४ व दि.१२.०२.२०२४ रोजी १०,०००/- रूपये लाचेची मागणी केली म्हणुन त्यांचे विरुध्द पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. माधव रेडडी व वाचक पोलीस निरीक्षक श्री. स्वप्नील राजपुत यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.