
चाळीसगाव तालुक्यातून मोटार सायकल चोरी तसेच चाळीसगाव आणि नाशिक जिल्ह्यातील नांदगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणबुडी मोटारींच्या चोरीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अत्यंत शिताफीने तपास करत या आंतर-तालुका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीची एक दुचाकी आणि तब्बल २९ पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी हस्तगत केल्या असून, टोळीतील तीन आरोपींना गजाआड केले आहे.
असा उघडकीस आला प्रकार:
गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हातगाव, अंधारी, रोहिणी तसेच नांदगाव तालुक्यातून शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. १६ सप्टेंबर २०२५ रोजी हातगाव येथून हिरो स्प्लेंडर मोटार सायकल चोरीला गेल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळगाव पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेडडी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमनाथ ऊर्फ लंगड्या रघुनाथ निकम (रा. अंधारी), सुधीर नाना निकम (रा. महारवाडी) आणि सम्राट रविंद्र बागुल (रा. महारवाडी) (सर्व ता. चाळीसगाव) या तिघांना ताब्यात घेतले.
चोरलेल्या २९ मोटारी हस्तगत:
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी मोटार सायकल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी मोटार सायकल हस्तगत केल्यानंतर, या आरोपींना विश्वासात घेऊन अधिक तपास केला. यावेळी, त्यांनी चाळीसगाव आणि नांदगाव परिसरातील विहिरीतून पाण्याच्या मोटारी चोरून त्या स्वतःच्या असल्याचे भासवून विकल्याची धक्कादायक माहिती दिली.
सुरुवातीला आरोपींच्या माहितीवरून पोलिसांनी ११ पाणबुडी मोटारी हस्तगत केल्या. यानंतर आरोपींचा ताबा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांकडे देण्यात आला. ग्रामीण पोलिसांनी न्यायालयाकडून पोलीस कोठडी घेऊन अधिक सखोल तपास केला असता, आरोपींनी आणखी १८ पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी चोरल्याची कबुली दिली.
या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांनी आरोपींकडून एकूण एक मोटार सायकल आणि २९ पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, वपोनि राहुल गायकवाड व पोनि शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि. शेखर डोमाळे, पोकॉ/महेश पाटील, भूषण शेलार, सागर पाटील, चापोकॉ बाबासाहेब पाटील तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सफौ. युवराज नाईक, पोहेकॉ/गणेश चव्हाण, दीपक नरवाडे, संदीप पाटील, तुकाराम चव्हाण, विजय पाटील यांच्या संयुक्त पथकाने परिश्रम घेतले. या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीतून पाणबुडी मोटारी चोरीस गेल्या आहेत, त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनशी तातडीने संपर्क साधून आपल्या मोटारींची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ओळख पटवावी व मोटारी ताब्यात घ्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.