हनीट्रॅप प्रकरण: मनोज वाणी यांची निर्दोष मुक्तता

जळगाव, प्रतिनिधी शहरातील गाजलेल्या हनीट्रॅप प्रकरणात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी मनोज लीलाधर वाणी यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जळगाव येथील पाचवे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. मिलिंद एम. निकम यांनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी हा निकाल दिला.
या प्रकरणी फिर्यादी अभिषेक शांताराम पाटील यांनी १६ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हा पेठ पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, आरोपी शाकंभरी सुर्वे नावाच्या महिलेने त्यांना फोन करून भेटण्यास बोलावले होते. दुसऱ्या दिवशी, फिर्यादीच्या कार्यालयात येऊन तिने, “तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढण्याचे काम मला देण्यात आले आहे. परंतु मला तुमचे नुकसान करायचे नाही. काही विरोधक तुम्हाला राजकारण आणि समाजातून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे सांगितले होते. या घटनेनंतर श्री. पाटील यांनी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली होती.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नं. ४३५/२०२० नुसार भारतीय दंड विधान कलम २९४ (अश्लील कृत्य), ४१७ (फसवणूक), १२० (ब) (गुन्हेगारी कट) आणि ३४ (समान उद्देश) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात मनोज लीलाधर वाणी यांनाही आरोपी करण्यात आले होते.
खटल्याची सुनावणी जळगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयात सुरू होती. सुनावणी दरम्यान, सरकार पक्षाला आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर करता आले नाहीत. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचे अवलोकन करून, न्यायालयाने आरोपी मनोज लीलाधर वाणी यांची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ऍड. वडवी यांनी तर आरोपी मनोज वाणी यांच्या वतीने ऍड. कुणाल पवार यांनी कामकाज पाहिले. या निकालामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.