शिरसोली–धानवडात प्रताप भाऊंची चर्चा रंगात! कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला!
“प्रताप भाऊ पुन्हा मैदानात या!” कार्यकर्त्यांची जोरदार मागणी!

जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्हा परिषदेच्या नव्या आरक्षणानुसार पाळधी खुर्द गट ‘सर्वसाधारण महिला’ राखीव ठरला असून या बदलामुळे जिल्हा राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. या गटातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूनबाईंच्या राजकीय प्रवेशाची शक्यता आता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.
पूर्वी या गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी प्रभावी कामगिरी बजावली होती. मात्र, नव्या आरक्षणानुसार त्यांचा पारंपरिक “हक्काचा गट” आता महिला राखीव ठरल्याने त्यांना या गटातून उमेदवारी मिळणे शक्य राहिले नाही. त्यामुळे प्रताप पाटील यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
मात्र, राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार प्रताप पाटील यांचा शिरसोली गटातून उमेदवारीचा पर्याय पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ठेवल्याची चर्चा जोरात! असून, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून या संदर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत. कार्यकर्त्यांकडून “आपला नेता कुठूनही उभा राहो, पण जिल्हा परिषदेत असायलाच हवा” अशी मागणी होत आहे.
दरम्यान, पाळधी खुर्द गट महिला राखीव झाल्याने गुलाबराव पाटील परिवारातील सदस्याला राजकारणात सक्रिय करण्याची संधी निर्माण झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे. त्यांच्या सूनबाईंच्या उमेदवारीची चर्चा सध्या सोशल मीडियावर आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत जोमाने सुरू असून, आगामी निवडणुकीत हा गट सर्वाधिक चर्चेत राहणार हे निश्चित झाले आहे.
स्थानिक पातळीवर या गटात निवडणुकीतील गणित अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.