बातम्या

खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा काही तासांत पर्दाफाश – स्थानिक गुन्हे शाखेची शिताफीदार कारवाई

खुनानंतर पोलिसांचा दबदबा – आरोपीला नशिराबादेत पकडलं!

जळगाव (दि. ३ ऑक्टोबर २०२५) :शहरातील कासमवाडी परिसरात झालेल्या निर्घृण खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केवळ काही तासांतच गजाआड करण्यात यश मिळवले. या शिताफीदार कारवाईमुळे जळगाव पोलिसांनी पुन्हा एकदा आपली धडाकेबाज कामगिरी दाखवून दिली आहे.


३ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास कासमवाडी परिसरात जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीएनएस गुन्हा क्र. ७०६/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम १०३ आदी कलमान्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला होता.


घटनेनंतर तात्काळ खुनातील आरोपीला अटक करण्याचे आदेश जळगावचे मा. डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक यांनी दिले. त्यानुसार मा. श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी विशेष पथक तयार केले.या पथकात पोह. नितीन बाविस्कर, पोना. किशोर पाटील, पो.कॅ. छगन तायडे, पो.कॉ. रविंद्र कापडणे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांचा समावेश करण्यात आला होता.पथकाने खबऱ्यांमार्फत गोपनीय माहिती मिळवून अल्पावधीतच आरोपीचा ठावठिकाणा लावला. त्यानंतर दक्षता आणि शिताफी दाखवत नशिराबाद परिसरातून खुनातील मुख्य आरोपी योगेश संतोष पाटील उर्फ पिंटु (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन
या संपूर्ण कारवाईत मा. डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव तसेच मा. नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव यांचे थेट मार्गदर्शन लाभले.

👉 या यशस्वी कारवाईमुळे जळगाव पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की कोणताही गंभीर गुन्हा घडल्यानंतर आरोपी कितीही चलाख असला तरी कायद्याच्या विळख्यातून सुटू शकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!