अमळनेरमध्ये अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटवर पोलिसांचा छापा – तिघे जेरबंद, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांचा गॅस माफियांवर धडाकेबाज छापा – अवैध धंद्याचा भंडाफोड

अमळनेर :
घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर अवैधरित्या चारचाकी वाहनांमध्ये भरून जीवितासह मोठा धोका निर्माण करणाऱ्या रॅकेटवर पोलिसांनी कारवाई करत तिघांना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता अमळनेर शहरातील बजरंग पॅलेसजवळील मिळचाळ परिसरात करण्यात आली.
अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मिळचाळ परिसरात एका चारचाकी (एमएच-५४ डी १८७९) मध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस भरला जात असल्याचे समजले. यावर त्यांनी तत्काळ पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, भूषण परदेशी, सुमित वानखेडे तसेच तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना शेख व पुरवठा निरीक्षक सचिन निकम यांना छापा टाकण्याचे आदेश दिले.
कारवाईदरम्यान पथक घटनास्थळी दाखल झाले असता, एका अल्पवयीन मुलाच्या दुकानावर गौरव हरी चौगुले (रा. मिळचाळ) आणि जितेंद्र रवींद्र उदेवाल (रा. गुरुकृपा कॉलनी) हे इलेक्ट्रिक पंपाच्या सहाय्याने घरगुती सिलेंडरमधून वाहनात गॅस भरताना आढळले.
तत्काळ पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली तर अल्पवयीन मुलाला नोटीस देऊन सोडण्यात आले. कारवाईत २ भारत गॅस व २ एचपी गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक पंप व सुमारे ५ लाख रुपये किमतीची चारचाकी असा एकूण ५ लाख १९ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी भूषण परदेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.