बातम्या

भाग्यवान क्षण! विवेकानंद नगरमध्ये बोरसे कुटुंबियांकडे उमलले ब्रम्हकमळ

जळगावकरांसाठी अभिमानाचा क्षण! विवेकानंद नगरात फुललेलं ब्रम्हकमळ

जळगाव-(प्रतिनिधी) : शहरातील विवेकानंद नगर येथे दिनांक 27 सप्टेंबर  2025 रोजी एक दुर्मिळ आणि शुभ मानला जाणारा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला. येथील रहिवासी गुलाबराव साहेबराव बोरसे यांच्या घराच्या बाल्कनीतील वृक्षावर तब्बल पाच वर्षांनंतर “ब्रम्हकमळ” हे फुल उमलले.

ब्रम्हकमळाचे वैशिष्ट्य
ब्रम्हकमळ हे अत्यंत दुर्मिळ मानले जाणारे फुल असून ते दरवर्षी नियमितपणे उमलत नाही. साधारणपणे हे फुल रात्री उशिरा उमलते व त्याचा सुवास संपूर्ण वातावरण पवित्र आणि प्रसन्न करतो. भारतीय संस्कृतीत या फुलाला धार्मिक महत्त्व आहे. ब्रम्हकमळ दर्शन लाभणे ही मोठी भाग्याची गोष्ट मानली जाते.

मध्यरात्रीचे अद्भुत दर्शन
गुलाबराव बोरसे यांच्या घरातील वृक्षावर पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे फुल उमलल्याने कुटुंबीयांसह परिसरातील रहिवासी रात्री उशिरापर्यंत जागे राहून या चमत्काराचे साक्षीदार झाले. फुल उमलताच वातावरणात दिव्य सुगंध दरवळला.

शुभ चिन्ह मानले जाते
या फुलाच्या उमलण्याला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत शुभ मानले जाते. घरामध्ये सुख-शांती, समृद्धी व आरोग्य लाभते, असा समज आहे. त्यामुळे बोरसे कुटुंबियांना तसेच परिसरातील रहिवाशांना या घटनेचा अपार आनंद झाला आहे.

परिसरात चर्चेचा विषय
ब्रम्हकमळ हे दुर्मिळ फुल पाहण्यासाठी शेजारी व नातेवाईक रात्रीच त्यांच्या घरी जमा झाले. फोटो काढणे, व्हिडीओ शूट करणे यामुळे हा क्षण अविस्मरणीय ठरला. पाच वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या या फुलामुळे विवेकानंद नगर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!