
पाचोरा (ता. पाचोरा) :पाचोरा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैधरित्या व विनापरवाना १८ तलवारी विक्रीसाठी बाळगणाऱ्या इसमावर पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, माहिजी नाका, पाचोरा येथे एक इसम विक्रीसाठी तलवारी आणल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पाचोरा शहरात सापळा रचला.
दरम्यान, संशयित इसम सोहेल शेख तय्युब शेख (वय २४ वर्षे, रा. स्मशानभूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा, जि. जळगाव) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विक्रीसाठी आणलेल्या एकूण १८ तलवारी, किंमत अंदाजे ५४,०००/- रुपये त्या लपवून ठेवलेल्या ठिकाणावरून जप्त करण्यात आल्या. चौकशीत त्याने यापैकी काही तलवारी आधीच विक्री केल्याची कबुली देखील दिली आहे.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४६०/२०२५, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) सौ. कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोउपनिरीक्षक कैलास ठाकुर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत (बकल नं. ९९०), जितेंद्र पाटील (बकल नं. १६०९), तसेच हरीष परदेशी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
🔹 या कारवाईमुळे पाचोरा शहरात मोठ्या प्रमाणात होऊ घातलेली अवैध शस्त्रांची विक्री उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.