दीपनगरात 200 सुरक्षा रक्षक रस्त्यावर – देशासाठी लढलेले जवान, शहीदांच्या विधवा व मुलांना बेरोजगारीचे संकट!
21 वर्ष सेवा करूनही अन्याय – मेस्को रक्षकांना कामावरून हटवले तर 1200 लोक उपाशी राहणार!

दीपनगर | दिपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पात मागील 21 वर्षांपासून महाराष्ट्र एक्स सर्विसमन कॉर्पोरेशन (MESKO) मार्फत सेवा बजावत असलेले सुरक्षा रक्षक आज अन्यायाच्या कचाट्यात अडकले आहेत.
येथे कार्यरत रक्षक हे आर्मी, BSF, CRPF व विविध सैन्य दलांमध्ये देशासाठी लढून निवृत्त झालेले सैनिक आहेत. त्यांच्यासोबत मृत सैनिकांच्या पत्नी आणि जवानांची मुलेही तुटपुंज्या पगारावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. देशासाठी रणांगणावर लढलेले जवान, त्यांची विधवा पत्नी आणि मुले आज उपासमारीच्या स्थितीत पोहोचली आहेत, हे दुर्दैवी वास्तव आहे.
हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ
आज मेस्को अंतर्गत कार्यरत असलेल्या 200 सुरक्षा रक्षकांबरोबर त्यांच्या कुटुंबातील एकूण 1100 ते 1200 लोक थेट बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असून, प्रशासनाची बेपर्वाई आणि सुरक्षा विभागाचा दुराग्रह याला जबाबदार असल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे.
समान वेतनाची मागणी, पण अन्यायाचा बळी
गेल्या 2 ते 3 वर्षांपासून दिपनगर प्रकल्पात महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) व Accurate Security या दोन एजन्सी कार्यरत आहेत. त्यांना मेस्को सुरक्षा रक्षकांच्या तुलनेत 5 ते 6 हजार रुपये जास्त वेतन दिले जात आहे.
👉 “आम्हालाही तेवढेच वेतन द्या” अशी न्याय्य मागणी मेस्को सुरक्षा रक्षकांनी केली.
परंतु या मागणीला मान्यता देण्याऐवजी प्रशासनाने त्यांना थेट बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
दबावाखाली घेतला जातोय निर्णय?
या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपही झाला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा ताई खडसे व मंत्री संजय सावकारे यांनी अधिकाऱ्यांना कॉल करून या रक्षकांच्या बाजूने विनंती केली. तरीसुद्धा काही अदृश्य दबावाखाली अधिकारी या सुरक्षा रक्षकांचा बळी घेत आहेत, असा आरोप होत आहे.
मेस्कोला हटवण्यासाठी ‘खेळी’?
मेस्को सुरक्षा रक्षकांचा आरोप आहे की,
-
मागील वर्षी “हेड ऑफिस सर्क्युलर” च्या नावाखाली 28 रक्षकांना कमी करण्यात आले.
-
तर या वर्षी मात्र MSF चे 45 ते 50 रक्षक वाढवले गेले.
यावरून MSF व सुरक्षा विभागाचे लागेबांधे असल्याचा संशय कर्मचाऱ्यांत वाढत आहे.
स्थानिकांना वगळून बाहेरचे?
मेस्को सुरक्षा रक्षक हे दिपनगर व आजूबाजूच्या गावांतील स्थानिक आहेत. प्रदूषण व त्रास सहन करून हे रक्षक काम करत आहेत. मात्र आता त्यांना वगळून बाहेरील रक्षकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
👉 “आम्ही देशासाठी लढलो, शत्रूंचा मुकाबला केला, पण आज आमचाच रोजगार हिरावला जात आहे. जर आम्हाला कामावरून काढले गेले तर याला दीपनगर प्रशासन, मेस्को प्रशासन आणि सुरक्षा विभाग जबाबदार असेल. विशेषतः दीपनगर सुरक्षा अधिकारी सर्वाधिक जबाबदार असतील.” असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
न्याय मिळणार की अन्याय सुरूच?
आज या 200 सुरक्षा रक्षकांना आणि त्यांच्या 1200 लोकांच्या कुटुंबांना न्यायाची गरज आहे. उद्यापर्यंत टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे न झाल्यास ही कुटुंबे उपाशी राहतील.
स्थानिक समाज, संघटना आणि जनतेने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे. कारण देशासाठी रणांगणावर रक्त सांडलेल्यांना त्यांच्या गावात रोजगार न मिळणे हा अपमान संपूर्ण समाजाचा आहे.
शेवटचा इशारा ⚠️
👉 “जर या प्रकरणात कोणाचा जीव गेला, आत्महत्या झाली किंवा कुठल्याही कुटुंबावर अनर्थ ओढावला, तर याला थेट महाजनको दिपनगर प्रशासन व सुरक्षा अधिकारी जबाबदार राहतील.”
👉 तातडीने टेंडर प्रक्रिया पारदर्शक व्हावी, मेस्को सुरक्षा रक्षकांना परत कामावर घेतले जावे आणि त्यांना न्याय्य वेतन द्यावे – हीच वेळेची गरज आहे.