बातम्या

जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेत मोठे बदल : निरीक्षक संदीप पाटील यांची बदली, राहुल गायकवाड यांची नियुक्ती

जळगाव – जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा (L.C.B.) निरीक्षक पद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने त्यांची तातडीने बदली करून त्यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक हे जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनंतर कायदा आणि सुव्यवस्था हाताळणारे अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. या पदावर होत असलेल्या बदलांकडे नेहमीच सर्वांचे लक्ष लागलेले असते.

गेल्या वर्षी, म्हणजेच ३१ मे २०२४ रोजी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचा सेवा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी बबन आव्हाड यांची नियुक्ती झाली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी ड्रग्स प्रकरणाचा मुद्दा विधानसभा अधिवेशनात गाजल्यामुळे आव्हाड यांची बदली करून त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. त्या जागी संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार आ. मंगेश चव्हाण यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांनी एका महिलेकडून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या सर्व घडामोडींचा आढावा घेत, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने कारवाई करत संदीप पाटील यांची बदली करून त्यांना नियंत्रण कक्षात नेले आहे. त्याचबरोबर, राहुल बाबासाहेब गायकवाड यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे.

या बदलामुळे जिल्ह्यातील पोलीस दलात चर्चेला उधाण आले असून, आगामी काही दिवसांत या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!