जिल्हा परिषदेचे अनोखे पाऊल – नागरिकांसाठी सुरू झाला “व्हॉट्सअॅप चॅटबोट

जळगाव | दि. २५ ऑगस्ट २०२५. जळगाव जिल्हा परिषदेतर्फे डिजिटल युगाशी सुसंगत असा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेच्या कार्यालयापर्यंत न जाता सहजपणे तक्रारी नोंदविण्यास आणि आवश्यक माहिती मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेने “व्हॉट्सअॅप चॅटबोट” सुरू केला आहे.
हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करनवाल (भा.प्र.से.) यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर http://zpjalgaon.gov.in या चॅटबोटची लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे नागरिकांना आता प्रशासनाशी थेट आणि सुलभ संवाद साधणे शक्य होणार आहे.
नागरिकांसाठी सुलभ सुविधा
➡️ जिल्हा परिषदेच्या विविध विभागांशी संबंधित तक्रारी नागरिक व्हॉट्सअॅपवरून सहज नोंदवू शकतील.
➡️ शाळा, आरोग्य, पाणीपुरवठा, महिला व बालविकास, ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या विभागांच्या योजनांची माहिती त्वरित मिळणार आहे.
➡️ सरकारी योजना, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती तात्काळ उपलब्ध होईल.
चॅटबोटचा वापर कसा करावा
जिल्हा परिषदेचा अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांक 📞 9421610645 असा असून, नागरिकांनी फक्त या क्रमांकावर ‘हॅलो’ असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर नागरिकांना टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन केले जाईल आणि तक्रारी नोंदविणे किंवा माहिती मिळविणे अधिक सोपे होईल.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे मत –मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करनवाल यांनी या उपक्रमाविषयी बोलताना सांगितले की,
> “प्रत्येक नागरिकापर्यंत प्रशासनाची सेवा पोहोचवणे आणि तक्रारींना वेळेत प्रतिसाद देणे हे आमचे ध्येय आहे. यासाठीच व्हॉट्सअॅप चॅटबोट हा अभिनव प्रयोग जळगाव जिल्हा परिषदेमार्फत सुरू केला आहे. या प्रणालीमुळे तक्रारी जलदगतीने नोंदविणे व त्यावर वेळेत कारवाई करणे सोपे होणार आहे.”
डिजिटल गव्हर्नन्सकडे मोठे पाऊल
हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या कामकाजात डिजिटल गव्हर्नन्स आणि ई-गव्हर्नन्स चा प्रभावी वापर वाढविणारा ठरणार आहे. या माध्यमातून प्रशासन अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
संपर्कासाठी:
जिल्हा परिषद, जळगाव
अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांक: 9421610645
वेबसाईट: http://zpjalgaon.gov.in