यावल नगरीत उत्साहाचा शिखर – देशमुख वाड्यात श्री गणरायाचे आगमन
भव्य आगमन सोहळा : देशमुख वाड्याचा राजा सज्ज!

यावल (प्रतिनिधी) : यावल नगरीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण चांगलेच भारावले आहे. क्रांती गणेश मित्र मंडळ, यावल यांच्या वतीने देशमुख वाड्याचा राजा या लाडक्या बाप्पाचा भव्य आगमन सोहळा सोमवार, दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता दिमाखदार पद्धतीने पार पडणार आहे.
या सोहळ्यात शिवक्रांती झांज पथकाचे वादन हे प्रमुख आकर्षण ठरणार असून, ढोल-ताशांच्या गजरात, पारंपारिक निनादात आणि गुलालाच्या उधळणीत श्री गणरायाचे स्वागत करण्यात येणार आहे. शिवक्रांती झांज पथकाचे गगनभेदी सूर आणि पारंपरिक ठेका वातावरण भारावून टाकणार आहेत.
गावातील तरुण मंडळी, महिला मंडळे तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मिळून संपूर्ण देशमुख वाडा व परिसर दिव्यांच्या रोषणाईने सजवला आहे. मंडळाकडून भव्य तोरण, आकर्षक सजावट आणि पारंपारिक झगमगाट यांची उत्तम सांगड घालण्यात आली आहे.
सोहळ्याच्या निमित्ताने भक्तिगीतांचा गजर, गुलाल उधळणी, तसेच लाडक्या बाप्पाचे पारंपरिक स्वागत करून आगमन सोहळा अविस्मरणीय ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
क्रांती गणेश मित्र मंडळ, यावल यांच्या वतीने यावल शहरातील व परिसरातील गणेश भक्तांना या भव्य आणि ऐतिहासिक आगमन सोहळ्यात सहभागी होऊन श्री गणरायाचे दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.