बातम्या

राजकीय खळबळ : माजी मंत्री देवकरांच्या १० कोटी कर्ज प्रकरणी थेट कारवाई!

राजकीय खळबळ : माजी मंत्री देवकरांच्या १० कोटी कर्ज प्रकरणी थेट कारवाई!

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याच्या राजकीय व सहकारी क्षेत्रात मोठा भूचाल घडवणारी कारवाई नुकतीच जिल्हा उपनिबंधकांनी केली आहे. महाविकास आघाडीकडून गेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी केलेले आणि अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर जिल्हा बँकेतून घेतलेल्या तब्बल १० कोटींच्या कर्ज प्रकरणात कठोर कारवाई झाली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी थेट बँक व्यवस्थापनाला आदेश देत, ही संपूर्ण थकबाकी तातडीने एकरकमी वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत.

पार्श्वभूमी : पदाचा गैरवापर?

सन २०२१-२२ मध्ये देवकर हे जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. त्याच काळात ते श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. सहकारी बँक नियमन कायदा १९४९ च्या कलम २० नुसार, कोणत्याही सहकारी संस्थेचा पदाधिकारी किंवा संचालक स्वतःच्या हितसंबंध असलेल्या संस्थेस थेट कर्ज मंजूर करू शकत नाही. मात्र, या कायद्याकडे दुर्लक्ष करून देवकर यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेच्या नावावर तब्बल १० कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा बँकेतून उचलल्याचा आरोप आहे.

तक्रारीनंतर चौकशी सुरू

या प्रकरणाची तक्रार झुरखेडा (ता. धरणगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक एस. जी. पाटील यांनी थेट सहकार विभागाकडे केली होती. त्यानंतर सहकार विभागाचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेवर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देत, नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांकडून तपास सुरू केला. चौकशीसाठी धुळे येथील जिल्हा उपनिबंधकांना जबाबदारी सोपवण्यात आली होती.

अहवालात ठपका व शिफारस

सदर चौकशी अहवाल गेल्या महिन्यात सादर करण्यात आला. त्यात माजी मंत्री देवकर यांनी पदाचा दुरुपयोग करून आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी कर्ज मंजूर करून घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले. अहवालात त्यांच्या विरोधात स्पष्ट ठपका ठेवत, संबंधित १० कोटींचे कर्ज तातडीने वसूल करण्याची शिफारस करण्यात आली होती.

आता प्रत्यक्ष कारवाई – एकरकमी वसुलीचे आदेश

या शिफारशीवर कार्यवाही करत, धुळे येथील जिल्हा उपनिबंधकांनी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापनाला आदेश जारी केले आहेत. त्यानुसार देवकरांच्या संस्थेकडून येणे बाकी असलेली संपूर्ण रक्कम तातडीने एकरकमी वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. कारण नुकतेच देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला असून, त्यांची पुनर्रचित राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय भूमिका अपेक्षित मानली जात होती. मात्र, त्यांच्यावर आलेले हे कर्ज प्रकरण आगामी काळात त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!