उत्तराखंडात अडकलेल्या पाळधीच्या तरुणांना एअरलिफ्ट केले; पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

जळगाव प्रतिनिधी। उत्तराखंडमधील प्रतिकूल परिस्थितीत अडकलेल्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील १३ तरुणांना गंगोत्री येथील हेलिपॅडवरून भारतीय हवाई दलाच्या (एअर फोर्स) हेलिकॉप्टरने ‘एअरलिफ्ट’ करण्यात आले आहे. त्यांना सुखरूप डेहराडून येथे उतरवण्यात आले असून, राज्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.
उत्तराखंडमध्ये ढगफुटी आणि भूस्खलनामुळे अनेक पर्यटक अडकले होते. यात जळगाव जिल्ह्यातील भाविकांचाही समावेश होता, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ दिल्ली गाठून महाराष्ट्र सदन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवांशी तसेच पोलीस उपमहानिरीक्षकांशी संपर्क साधून बचावकार्यासाठी विनंती केली होती.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, पाळधी येथील हे तरुण आता सुरक्षित आहेत. त्यांना डेहराडून येथे उतरवण्यात आल्याची माहिती मिळताच, पालकमंत्र्यांचे सहकारी या तरुणांना घेण्यासाठी डेहराडून येथे पोहोचले आहेत. या सर्व तरुणांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या यशाबद्दल पालकमंत्र्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, अडकलेल्या इतर भाविकांनाही लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.