हनी ट्रॅप प्रकरणाचा वाद आता निखिल खडसे यांच्या मृत्यूच्या चौकशीपर्यंत ?

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील जुना वाद आता नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल लोढा या व्यक्तीचे नाव समोर आल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी प्रफुल लोढा आणि गिरीश महाजन यांच्यात जवळीक असल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटीमार्फत (SIT) सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
गिरीश महाजन यांचा पलटवार
खडसे यांच्या आरोपांनंतर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, त्यांनी यावेळी निखिल खडसे यांच्या मृत्यूचा उल्लेख करत खळबळजनक दावे केले.
“खडसे यांनी ज्यावेळी लोढा यांच्यावर आरोप केले, त्यावेळी मला बोलणं भागच आहे,” असं म्हणत महाजन म्हणाले की, “निखिल खडसे यांच्या आत्महत्येच्या वेळी प्रफुल लोढाच खूप काही बोलला होता. त्यावेळी तो खूप बडबड करत होता. आता त्याच्यावर एसआयटी चौकशीची मागणी करतायत.”
सरपंच-ग्रामसेवक अनधिकृत व्यक्तीच्या घरी? गावकऱ्यांचा थरारक आरोप!
गंभीर आरोप : “खडसेंनीच मुलाचा खून केला, असं लोढा म्हणाला होता!”
महाजन यांचा दावा आहे की, “प्रफुल लोढानेच सांगितले की खडसेंनी त्यांच्या मुलाचा खून केला होता.”
“मला त्यावर बोलायचं नव्हतं, पण खडसे वारंवार बोलतात, त्यामुळे हे सांगणं भाग आहे. मी त्या लेव्हलचा माणूस नाही, पण तुम्ही जर सीमारेषा ओलांडत असाल, तर आम्हालाही बोलावंच लागतं,” असं म्हणत महाजन यांनी खडसेंवर जोरदार पलटवार केला.
खडसेंचा प्रत्युत्तर हल्ला : “हिम्मत असेल तर पुन्हा चौकशी करा”
गिरीश महाजन यांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसे यांनीही तातडीने प्रतिक्रिया दिली आहे.
“नेहमी माझ्या मुलाच्या मृत्यूचा संदर्भ देऊन इशारे का दिले जातात? त्यावेळी पोलिसांनी संपूर्ण तपास केला आहे आणि तो मृत्यू हा आत्महत्या होती, असा निष्कर्ष त्यांनी दिला आहे. तरीही आता पुन्हा हा विषय उपस्थित केला जात आहे. मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. दम असेल तर चौकशी करा,” असं आव्हानच खडसे यांनी महाजन यांना दिलं.
“तुमच्या घरातलीही माहिती माझ्याकडे आहे!” – खडसे
खडसे यांनी महाजन यांना इशारा देताना म्हटलं की, “मलाही तुमच्या घरात काय काय घडतं, याची माहिती आहे. मीही बोलू शकतो. पण आपण पातळी गाठली पाहिजे. मी माझा मुलगा गमावलेला आहे. त्या जखमेवर मी पाय नको ठेवावेत असं सुचवतो.”