
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरातील नामांकित हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये सुरू असलेल्या अवैध तिनपत्ती जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री धडक कारवाई केली. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात वाढत्या जुगाराच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या लेखी आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी कारवाई केली.
यासाठी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार अकरम याकुब शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, संदीप चव्हाण, पोलीस नाईक किशोर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र कापडणे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
१० जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, जळगाव शहरातील जयनगर परिसरात सागरपार्क मैदानाजवळील हॉटेल रॉयल पॅलेसच्या रूम नंबर २०९ मध्ये काही इसम स्वतःच्या फायद्यासाठी तिनपत्ती (झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत असून, त्यावर मोठ्या प्रमाणात पैशांची हारजीत सुरू आहे.
ही माहिती खात्रीशीर असल्याची खात्री झाल्यानंतर ११ जुलै रोजी मध्यरात्री १२.०१ ते १.०० वाजेच्या दरम्यान पथकाने छापा टाकला. छाप्यादरम्यान सदर रूम मदन लुल्ला यांच्या नावावर आरक्षित असल्याचे निष्पन्न झाले.
कारवाई दरम्यान आठ इसमांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १९ लाख ९७ हजार रुपये रोख रक्कम, विविध कंपन्यांचे १३ मोबाईल हँडसेट, तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण मोठ्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात सहायक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्र. २५३/२०२५, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १२(अ), ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
पोलीस अधीक्षकांनी दिलेले निर्देश ठरले निर्णायक
जळगाव जिल्ह्यात वाढत चाललेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून, जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.