सोन्याच्या लालसेने घेतला जीव! ओळखीच्या व्यक्तीनेच केला खून!

जळगाव – पारोळा तालुक्यातील सुमठाणे गावाजवळील राखीव वनक्षेत्रात एका महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा पर्दाफाश करत स्थानीक गुन्हे शाखा व पारोळा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीने दागिन्यांच्या मोहातून खून केल्याची कबुली दिली आहे.
घटना कशी उघडकीस आली?
दि. २६ जून २०२५ रोजी सुमठाणे (ता. पारोळा) गावाजवळील राखीव कुरणाच्या जंगलात अंदाजे ४५ ते ५० वयोगटातील अनोळखी महिलेचा चेहरा विद्रूप झालेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात CCTNS भाग-५ अन्वये गुरनं. १५४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०३(१), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षकांनी दिले तातडीने आदेश
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव) यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या समवेत मा. श्रीमती कविता नेरकर (उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर) ह्या देखील उपस्थित होत्या. गुन्ह्याच्या तपासाला दिशा देत, अनोळखी मृत महिलेची ओळख पटवण्याच्या दृष्टीने विशेष तपास पथके तयार करण्यात आली.
तपासाची दिशा व मृत महिलेची ओळख
पारोळा पोलीस निरीक्षक सचिन सानप व स्था. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने जळगाव व धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत हरविलेल्या महिलांची नोंद तपासली. परंतु कोणतीही नोंद मिळाली नाही. दरम्यान, उंदीरखेडे (ता. पारोळा) येथील शोभाबाई रघुनाथ कोळी (वय ४८) या महिला हरवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेहाची व शोभाबाई यांच्या फोटोंची तपासणी केल्यावर मृतदेह त्यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. शव त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
तांत्रिक विश्लेषणातून आरोपीपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा
मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांनी महिलेकडील मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्याचे आदेश दिले. या विश्लेषणातून सुमठाणे गावातील अनिल गोविंदा संदाशिव हा मृत महिला शोभाबाई कोळी यांच्यासोबत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सुमठाणे गावात जाऊन अनिलचा शोध घेतला, परंतु तो फरार होता.
मोटारसायकलवरून जात असताना आरोपी अटकेत
दि. २८ जून रोजी मध्यरात्री पारोळा पोलिस व स्था. गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने धुळे जिल्ह्यातील शिताणे गावाच्या रस्त्यावर मोटारसायकलवरून जात असलेल्या अनिल गोविंदा संदाशिव यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शोभाबाई यांच्याशी आधीच ओळख करून घेतल्याची व त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसाठी खून केल्याची कबुली दिली.
खुनामागचे कारण – दागिन्यांचा हव्यास
मयत महिला ही पारोळा शहरात धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करत होती. ती नेहमीच शरीरावर सोन्याचे दागिने परिधान करत होती. अनिल गोविंदा संदाशिव याने विश्वास संपादन करून महिलेला सुमठाणे गावाजवळील कुरणात घेऊन जाऊन खून केला. सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन तो फरार झाला होता.
तपास यशस्वी करणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी
या गुन्ह्याच्या यशस्वी तपासासाठी अथक प्रयत्न करणारे अधिकारी व कर्मचारी: श्री संदीप पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्था. गुन्हे शाखा, जळगाव), श्री सचिन सानप (पो. नि., पारोळा पो. स्टे.), सपोनि चंद्रसेन पालकर, सपोनि योगेश महाजन, पोउपनि जितेंद्र वल्टे, पोउपनि शंकर ढोमाळ, पोह/संदीप पाटील, पाहा प्रविण मांडोळे, पोहा हरलाल पाटील, चापोह भरत पाटोल, पोको राहूल पाटील, सुनिल हाटकर (418), महेश पाटील (1027), डॉ. शरद पाटील (422), संदीप सातपुत (3074), अभिजीत पाटील (1612), चतरसिंग मेहर (445), काजल जाधव (2045), आशिष गायकवाड (850), अनिल राठोड (2258), मिथून पाटील (459), विजय पाटील (282), सविता पाटील (2045), मधुकर पाटील (चालक, पति 3310), भैय्यासाहेब पाटील (चालक).