भीषण अपघात! दोन ट्रकची समोरासमोर धडक

जळगाव –जळगाव शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावर आज मंगळवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला. स्वामी नारायण मंदिराजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन एक ट्रक चालक जागीच ठार झाला असून दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सकाळी सुमारे ७.३० च्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, ओडिशा पासिंगचा ट्रक (क्रमांक – OD-15-C-2963) आणि राजस्थान पासिंगचा ट्रक (क्रमांक – RJ-14-GT-0421) यांच्यात समोरासमोर जबरदस्त धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की, एक ट्रक चालक केबिनमध्ये अडकून गेला होता. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन अडकलेल्या चालकाला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. केबिन दोरीच्या सहाय्याने ओढून त्याला बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी असून त्याच्या डोळ्याला मोठी इजा झाली आहे. त्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातस्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या अपघातामुळे महामार्गावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.
पोलीस अधिक तपास करीत असून ट्रकचालक कोणत्या दिशेने, कोणत्या वेगात जात होते, हे शोधले जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार एका ट्रकने रस्ता ओलांडताना वेगावर नियंत्रण गमावल्यामुळे ही धडक झाली असावी, असा कयास वर्तवला जात आहे.