पालकमंत्र्यांच्या हस्ते महिलांच्या व्यवसायाचं भूमिपूजन! पाहा काय आहे खास!

जळगाव, दि. २२ जून: “जिथे स्त्री सक्षम आहे, तिथे कुटुंब समृद्ध असतं आणि जिथे कुटुंब समृद्ध आहे तिथे समाज उन्नत होतो. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग स्वीकारला, हेच खरं सशक्तीकरण आहे. आणि त्या सशक्ततेचं प्रतीक म्हणजे ‘बहिणाई मार्ट’,” अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबतची भूमिका स्पष्ट केली.
पाळधी-बांभोरी परिसरातील स्त्री शक्ती महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘बहिणाई मार्ट’ या विशेष उपक्रमाचं भूमिपूजन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पार पडले. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी शासनाच्या वतीने १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ग्रामीण महिलांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महिलांचे सशक्तीकरण हेच सामाजिक परिवर्तनाचे साधन – पालकमंत्री
या वेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की,
> “सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. गावागावातील घराघरातून उद्योजिका तयार होतील, ही आमची खात्री आहे. पाळधीच्या मातीतून आता बचत गटांचा स्वतःचा ब्रँड निर्माण व्हावा, उत्पादनातून ओळख निर्माण व्हावी आणि महिलांना थेट बाजारपेठ मिळावी हीच आमची अपेक्षा आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, महिलांच्या वेळेत कर्जफेडीमुळे बचत गटांचा बँकांमधील विश्वास प्रस्थापित झाला असून बँकांमध्ये त्यांची पतशक्तीही वाढली आहे. आज बचत गट हे केवळ बचतीचं साधन न राहता समाज परिवर्तनाचे प्रभावी केंद्र ठरत आहेत.
बचत गट हे प्रशासनासाठी विश्वासार्ह – मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
> “स्त्री शक्ती हेच खऱ्या अर्थाने बचत गटांचं सामर्थ्य आहे. महिलांनी व्यवसायासाठी जिद्द ठेवून वाटचाल केली पाहिजे. प्रशासनाच्या दृष्टीने महिला बचत गट हे अत्यंत विश्वासार्ह आणि सक्रिय घटक आहेत.”
कर्जवाटपाचे १००० कोटींचे उद्दिष्ट
प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
> “जिल्ह्यात सध्या ३० हजार बचत गट कार्यरत आहेत. त्यांना आतापर्यंत ७५० कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले असून, दरवर्षी ८०० ते १,००० कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवले आहे.”
अन्य मान्यवरांचे मार्गदर्शन
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी ग्रामसंघासाठी कार्यालय उभारणीसाठी सहकार्याची ग्वाही दिली.
आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक अरुण पवार यांनी आदिवासी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची रूपरेषा
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्री शक्ती महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा उषाबाई पाटील होत्या. प्रारंभी दीपप्रज्वलन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक किरण महाजन यांनी केलं.सूत्रसंचालन कृषी सखी आशा पाटील आणि सुवर्णा साळुंखे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुनम पाटील यांनी केले.
- उपस्थित मान्यवरांची यादी या कार्यक्रमाला खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली:
- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
- जिल्हा परिषद माजी सदस्य प्रतापराव पाटील
- सरपंच लक्ष्मीताई कोळी
- उपसरपंच दिलीप पाटील
- मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल
- प्रकल्प संचालक राजू लोखंडे
- आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार
- गटविकास अधिकारी किशोर वानखेडे
- जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई
- अनिल कासट, मच्छिंद्र साळुंके, चंदू माळी, दिगंबर सोनवणे
- ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाठक, संजय महाजन, समाधान पाटील
- तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, सचिन पवार, रवी चव्हाण सर
- विविध बँकांचे अधिकारी
- पाळधी-बांभोरी प्रभागातील महिला बचत गटांच्या सदस्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.