बातम्या

5000 रुपयांची लाच घेताना वायरमन रंगेहात अडकला

जळगाव – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) जळगाव युनिटने मोठी यशस्वी कारवाई करत महावितरणच्या कंत्राटी वायरमनला 5000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही घटना दिनांक 10 जून 2025 रोजी घडली असून, आरोपी विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

घटनेचा तपशील:

तक्रारदार हे जळगाव येथील 46 वर्षीय पुरुष असून त्यांच्या राहत्या घराचे वीज मीटर हे अजूनही घराच्या पूर्वीच्या मालकाच्या नावावर होते. त्यामुळे महावितरण विभागाकडून मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू होती. याच पार्श्वभूमीवर, दिनांक 7 जून रोजी महावितरणचा कंत्राटी वायरमन भूषण शालिग्राम चौधरी (वय 37, नेमणूक – प्रभात कॉलनी कक्ष, जळगाव) त्यांच्या घरी आला.

आरोपीने तक्रारदारास सांगितले की, मीटरचे सील तुटलेले आहे आणि त्यामध्ये छेडछाड झालेली आहे. त्यामुळे तक्रारदारावर वीज चोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. हा गुन्हा टाळण्यासाठी आणि मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ‘ठीक’ (OK) लावण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे 15,000 रुपयांची लाचेची मागणी केली.

RTI

तक्रार व पडताळणी:

तक्रारदाराने हा प्रकार ACB जळगाव यांच्याकडे कळवला. त्यानुसार दिनांक 10 जून रोजी ACBच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपी भूषण चौधरीने स्वतःसाठी व मीटर तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एकूण 5000 रुपयांची लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

रंगेहात कारवाई:

त्याच दिवशी ACB जळगावच्या पथकाने सापळा कारवाई राबवली आणि आरोपीने पंचासमक्ष 5000 रुपये स्वीकारताच त्यास रंगेहात पकडण्यात आले. लाच घेताना साक्षीदारांसमोर व्यवहार झाल्याने आरोपीविरुद्ध ठोस पुरावा उपलब्ध झाला आहे.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल:

भूषण चौधरी याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अंतर्गत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारवाईदरम्यान, लाच रकमेची हॅश व्हॅल्यू सुद्धा नोंदवण्यात आली आहे.

कारवाईतील अधिकारी व कर्मचारी:

पर्यवेक्षण अधिकारी: श्री. योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, ACB, जळगाव

 

सापळा व तपास अधिकारी: पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे

सापळा पथक: सफौ. सुरेश पाटील (चालक), पोहेकॉ. सुनील वानखेडे, पोकाॅ. अमोल सूर्यवंशी

मार्गदर्शक: मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ACB, नाशिक परिक्षेत्र

 

नागरिकांना आवाहन:

ACB जळगावमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी व्यक्तीने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:

 

📍 अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव

▪️ कार्यालय: अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव

▪️ 📞 फोन: 0257-2235477

▪️ 📱 मोबाईल: 9702433131

▪️ ☎️ टोल फ्री क्र.: 1064

 

ACB जळगाव – भ्रष्टाचारविरोधात सजग आणि सक्रिय!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!