शिवकॉलनी चौक पुन्हा रक्तरंजित; भरधाव वाहनाखाली तहसीलचा कर्मचारी

जळगाव, दि. १ जून (श्री मराठी न्यूज) –
शिवकॉलनी चौकातील अपघातांचा मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. रविवारी (दि. १ जून) दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका भरधाव चारचाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली. या भीषण अपघातात धरणगाव तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेले विशाल रमेश सोनार (वय ४४) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
“मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विशेष : शुभेच्छा जाहिराती पाहा”
भरधाव वाहनाची जोरदार धडक
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विशाल सोनार हे शिवकॉलनी चौकात रस्ता ओलांडत असताना खोटेनगरकडून भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांना जबरदस्त धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. स्थानिकांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कळवले. काही वेळातच पोलीस आणि वाहतूक शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले.
वाहनचालक फरार, शोध सुरू
अपघात घडवून चारचाकी वाहनाचा चालक घटनास्थळाहून पळून गेला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरू केला असून लवकरच कारवाई केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
शिवकॉलनी चौक: अपघातांचा ‘हॉटस्पॉट’
शिवकॉलनी चौक हा जळगाव शहरातील सर्वाधिक अपघातग्रस्त भाग मानला जातो. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी मोठे आंदोलन केले होते. त्या वेळी प्रशासनाने गतिरोधक व सिग्नल यंत्रणा बसवण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार काही उपाययोजना राबवण्यात आल्या असल्या तरी त्यांची देखभाल व कार्यान्वयन अपयशी ठरल्याचे रविवारीच्या दुर्घटनेवरून दिसून येते.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात उष्णतेमुळे गतिरोधकांचे डांबर वितळल्याने ते प्रभावहीन झाले, तर रविवार असल्यामुळे सिग्नल यंत्रणा पूर्णतः बंद होती. त्यामुळे वाहतूक नियंत्रण पूर्णपणे विस्कळीत होती.
नागरिकांमध्ये संतापाची लाट
या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. “प्रशासनाने वेळेवर उपाययोजना केल्या असत्या, तर विशाल सोनार यांचा जीव वाचला असता,” असे नागरिकांचे म्हणणे आहे. शिवकॉलनी चौकातील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
4 Comments