बातम्या

जळगावचे डीवायएसपी यांचे पथक भुसावळमध्ये – २३ ग्रॅम एमडीसह आरोपी अटकेत

जळगाव/भुसावळ – भुसावळ शहरातील आरोपीच्या घरातून २३ ग्रॅम एमडी (मेथॅम्पेटामिन) प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, जळगाव शहर पोलीस व डीवायएसपी संदीप गावित यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई दिनांक ३ मे रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत केली. याप्रकरणी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या कारवाईचा प्रारंभ जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात करण्यात आलेल्या धाडीतून झाला. शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने काही दिवसांपूर्वी या भागात छापा टाकून अमली पदार्थ हस्तगत केले होते. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी सरफराज याच्याकडून सखोल चौकशी केली असता त्याने याकुब या इसमाचे नाव पुढे आणले. पोलिसांनी याकुबवर पाळत ठेवून तो जळगावमध्ये आल्यावर तात्काळ त्याला अटक केली.

याकुबकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास करण्यात आला असता, भुसावळ येथील अन्सार भिस्ती आणि वसीम खान या दोघांची नावे पुढे आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वसीम खान याच्या भुसावळमधील निवासस्थानी छापा टाकला. झडतीदरम्यान त्याच्या घरातून सुमारे २३ ग्रॅम एमडी ड्रग्स हस्तगत करण्यात आले.

या धाडीत डीवायएसपी संदीप गावित यांच्यासह शहर पोलीस स्टेशनचे एपीआय नाईक, विकास महाजन , अवेश शेख, चंद्रकांत पाटील, यांच्या पथकाने व फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी व इतर पोलीस कर्मचारी सहभागी होते. घटनास्थळी वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करत पुरावे संकलित करण्यात आले.

त्यानंतर या तिन्ही आरोपींना जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पोलिसांच्या मागणीला दुजोरा देत तिघांनाही ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता वर्तवली असून अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!