बातम्या

चोपड्यात थरार: बापाने मुलीच्या लग्नात घुसून केला गोळीबार, जागीच मृत्यू

प्रतिनिधी, जळगाव :जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात प्रेमविवाह केल्याच्या रागातून ऑनर किलिंगची थरारक घटना घडली आहे. निवृत्त सीआरपीएफ पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) किरण मांगले यांनी आपल्या मुलीच्या लग्नसमारंभात घुसून थेट गोळीबार केला. या भीषण घटनेत त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती मांगले (वय अंदाजे २६ वर्षे) हिने साधारण वर्षभरापूर्वी अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर हे दोघं पुण्यात स्थायिक झाले होते. शनिवारी, अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी दोघंही चोपडा येथे आले होते.

या गोष्टीची माहिती मिळताच तृप्तीचा वडील किरण मांगले चोपडा येथे आले आणि थेट लग्नस्थळी घुसून त्यांनी आपल्या मुलीवर आणि जावयावर बेछूट गोळीबार केला.

या गोळीबारात तृप्तीची जागीच प्राणज्योत मालवली, तर अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर लग्नसमारंभातील वऱ्हाड्यांनी संतापून किरण मांगले यांना पकडून बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांनाही गंभीर दुखापत झाली असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

प्रेमविवाहाचा राग मनात धरून एका बापाने आपल्या मुलीचे आयुष्य संपवल्याची ही दुर्दैवी घटना असून, यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!