छत्रपती संभाजीनगरचा तरुण बुलेट चोरटा पकडला!

छत्रपती संभाजी नगर येथील एका तरुणास दोन महागड्या बुलेट मोटारसायकलींसह अजिंठा चौफुली, जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार करण्यात आली.
गोपनीय माहिती अशी मिळाली होती की, एक तरुण अजिंठा चौफुली येथे महागडी बुलेट चोरी करून स्वस्त दरात विक्री करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोधपथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोहेका. गणेश शिरसाळे, पोका. गणेश ठाकरे, राहुल रगडे, विशाल कोळी व योगेश बारी यांना चौफुली येथे पाठविण्यात आले.
तेथे गेले असता, लाल रंगाची विना नंबर प्लेटची बुलेट घेऊन एक तरुण उभा असल्याचे आढळले. सदर पथकाने त्याला पळून जाण्यापूर्वीच शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव साजीद खान शकिल खान, रा. छत्रपती संभाजी नगर असे सांगितले. बुलेटची कागदपत्रे मागितली असता त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत.
सदर बुलेटचा चेसिस नंबर ऑनलाईन तपासला असता ती पुणे येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे साजीद खान याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या संशयावरून गुन्हा रजिस्टर नंबर 255/2025 बीनएसएस कलम 303 (2) अन्वये अटक करण्यात आली.
पोलिस कोठडीत चौकशी दरम्यान आरोपीने आणखी एक महागडी बुलेट – YEZDI ROADSTER – चोरल्याची कबुली दिली. दोन्ही बुलेट्स मिळून सुमारे ₹2,50,000/- किमतीच्या आहेत. या प्रकरणी पुणे येथील चंदननगर पोलीस स्टेशन आणि छत्रपती संभाजी नगर येथील सातारा पोलीस स्टेशन येथे मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
संबंधित पोलीस स्टेशनला आरोपी हस्तांतरणाबाबत कळविण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी (सो), मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (सो), मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत (सो), व मा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोहेका. गणेश शिरसाळे हे करत आहेत.