निवडणुकीत सहानुभूती मिळवण्याचा डाव फसला उमेदवारच ठरला गोळीबार प्रकरणाचा सूत्रधार!

जळगाव जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी पहाटे घडली होती. या घटनेने निवडणुकीच्या वातावरणात खळबळ उडवली होती. मात्र, पोलिसांनी घडलेल्या प्रकरणाचा सखोल तपास करताच धक्कादायक वास्तव समोर आले आहे.अपक्ष उमेदवार शेख अहमद यांनी मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी आपल्या भाचा, मुलगा, शालक आणि त्यांच्या मित्रासोबत मिळून स्वतःच्या घरावर गोळीबार करण्याचे षडयंत्र रचले होते. सुरुवातीपासूनच प्रकरणात अनेक अनिश्चितता होती, ज्यामुळे पोलिसांनी तपास अधिक बारीकपणे केला. खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी यातील षडयंत्र उघड केले.या प्रकरणात पोलिसांनी इरफान अहमद मोहम्मद हुसेन, शेख अहमद शेख हुसेन, शेख शिबान फाईज अहमद हुसेन, मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा, आणि शेख उमर फारूक अहमद हुसेन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील मोहम्मद शफीक उर्फ बाबा आणि शेख उमर फारूक हे दोघे फरार आहेत, तर इतर तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.हा प्रकार निवडणुकीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी अशा प्रकारचे बनाव करणाऱ्या उमेदवारांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास करून दोषींवर कठोर पावले उचलण्याचे आवाहन करण्यात येत आहे.तपासात एलसीबीचे तपासाधिकारी पीएसआय दत्तात्रय पोटे यांना वेळोवेळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे मार्गदर्शन मिळत गेल्याने तपासाला गती देता आली.
तपासातून मोहम्मद शफिक शेख अहमद उर्फ बाबा याने गोळीबार केल्याचे समोर आले. तर त्याच्यासह उमेदवार शेख अहमद यांचा लहान मुलगा शेख उमर फारूक हुसेन हा देखील फरार आहे. (केसीएन) त्यांचा शोध सुरु आहे. तर गुन्ह्यातील बंदुकीसह इतर मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे. सदर तपासकामी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित आणि एलसीबीचे पोलीस अधीक्षक बबन आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, हेकॉ विजयसिंग पाटील, अक्रम शेख, रवि नरवाडे, राजेश मेंढे, जितेद्र पाटील विजय पाटील, ईश्वर पाटील, हरिलाल पाटील यांनी केला आहे.