गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील डमी उमेदवारच्या अर्जामुळे गुलाबराव देवकरांवर टीका; जाणून घ्या काय आहे प्रकार

जळगाव : निवडणुकीत तगड्या उमेदवारा विरोधात नाम साधर्म्य असलेले डमी उमेदवार उभे करणे हा प्रकार नवा नाही. मात्र डमी उमेदवार उभे करतांना ‘विशेष’ काळजी घेतली जाते. म्हणजे, यामागे कोण आहे? हे समोर यायला नको. आता विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री व शिवसेना-महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुलाब रघुनाथ पाटील (रा.शेवगे बु.ता.पारोळा) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात दाखल झालेल्या या अर्जामुळे गुलाबराव देवकरांवर टीका होवू लागली आहे. नेमका हा प्रकार काय आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.या प्रकरणातील गंमत म्हणजे, गुलाब रघुनाथ पाटील (रा.शेवगे बु.ता.पारोळा) यांनी अर्ज दाखल करतांना नमुना २६ भरतांना ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र भरुन दिले आहे. त्याची रितसर नोटरी देखील करण्यात आली आहे. नोटरी ही ॲड.पी.के.देशमुख यांच्या मार्फत करण्यात आली आहे. त्यांच्या स्टँम्पचा सीएन क्रमांक ६८६८९५ असा आहे. दरम्यान या मतदारसंघातून गुलाबराव देवकर यांनीही राष्ट्रवादी पक्षातर्फे नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. त्यांनीही अर्ज दाखल करतांना नमुना २६ भरतांना ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र भरुन दिले आहे. त्याची रितसर नोटरी ही ॲड.प्रशांत बाविस्कर यांच्या मार्फत करण्यात आली आहे. योगायोग म्हणजे त्यांच्या स्टँम्पचा सीएन क्रमांक ६८६८९६ असा आहे. दोन्ही उमेदवारांनी नोटरी वेगवेगळ्या ठिकाणांहून केली आहे. त्याचे रजिस्टर सिरीयल क्रमांक व तारखा देखील वेगवेगळ्या आहेत मात्र सीएन क्रमांक ६८६८९५ व ६८६८९६ असे लागोपाठचे असल्याचे समोर आल्यामुळे या ‘योगायोग’ची मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.