
जळगाव : लोकसभेच्या जळगाव व रावेर या दोन मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असून, अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आलेले नाहीत.
मविआकडून २४ रोजी अर्ज दाखल करण्याची तयारी करण्यात आली असून, त्यासाठी उद्धवसेनेतर्फे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत, तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. सभेला आदित्य ठाकरे, संजय राऊत व जयंत पाटील हे संबोधित करणार आहेत. ठाकरे व राऊत यांचा दौरा निश्चित झाल्याची माहिती उद्धव सेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली.
जयंत पाटील यांनीही होकार दिला असला तरी, दौऱ्याची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झाली नसली तरी, जयंत पाटील यांनी होकार दिला असल्याचे, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करताना, मविआकडून शक्तीप्रदर्शनही केले जाणार आहे.
महायुतीचे उमेदवार २५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी दिली.