खडसे म्हणाले, “गिरीश महाजन वारंवार माझ्याबाबत फेकाफेकी करत असतात. मागील वेळीही त्यांनी कोथळी ग्रामपंचायत माझ्या ताब्यात नसल्याचं वक्तव्य केलं होतं. पण गेल्या 37 वर्षांपासून कोथळी ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं.”
तसेच खडसे यांनी स्पष्ट केलं की, “महाजन म्हणाले होते की, मंदाकिनी खडसे जेलमध्ये जाणार होत्या. पण मी त्यांना वाचवलं. हे विधान पूर्णतः चुकीचं आहे. मला जामीन सुप्रीम कोर्टातून मिळाला, गिरीश महाजन या प्रकरणात खोटं बोलत आहेत. मला आणि माझ्या पत्नीला जेलमध्ये पाठवण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.”
संपत्तीबाबत गंभीर आरोप
खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या संपत्तीवर सवाल उपस्थित केला. “महाजन हे एका शिक्षकाचे पुत्र आहेत. पूर्वी ते भाड्याच्या खोलीत राहत होते. मग एवढी कोट्यवधींची संपत्ती कुठून आली?” असा सवाल करत त्यांनी आरोप लावला की, “मी सात वर्षांचा असताना माझ्या नावावर शंभर एकर जमीन होती, हे माझे आर्थिक बळ स्पष्ट करतं.”
धरणातील जमीन घोटाळ्याचा आरोप
खडसे यांनी दावा केला की, “गिरीश महाजन यांनी धरण प्रकल्पात जमीन जाणार असल्याची माहिती आधीच मिळवून ती जमीन विकत घेतली आणि सुमारे 15 कोटी रुपये हडप केले. मंत्री असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग केला.”
महामार्ग प्रकल्पावरून खडसे – महाजन यांच्यात वाद
इंदूर-हैदराबाद महामार्ग प्रकल्पात खडसेंची जमीन येणार आहे, यावरून गिरीश महाजन यांनी आरोप केला की, “खडसे यांनी मोबदला मिळावा यासाठी जमीन अलीकडेच खरेदी केली.” यावर प्रत्युत्तर देताना खडसे यांनी महाजनांवर वरचढ टीका करत हा आरोप खोडून काढला.