सप्ताहाचे आयोजन आणि उपस्थिती
सप्ताहाचे आयोजन जी.पी.एस. मित्र परिवार, विक्की बाबा युवा मंच, शिवसेना-युवसेना तसेच पाळधी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. पाळधी गावात दिवसभर हरिपाठ, नामस्मरण, टाळ-मृदंगाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हालेला होता.
हृदयाला भिडणारे कीर्तन
कांचनताई जगताप यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून संत तुकाराम महाराजांच्या “देव जाणता” या अभंगाचे चिंतन मांडले. त्यांच्या ओघवत्या वाणीला हृदयस्पर्शी गायनाची जोड मिळाली आणि उपस्थित श्रोते भक्तिरसात चिंब भिजले. “आनंदी आनंद झाला, भक्ती मार्गी जीव लागला” या अभंगाचा गहिरा अर्थ उलगडताना त्यांनी भक्तीचा आत्मिक अनुभव श्रोत्यांपर्यंत पोहोचवला.
त्यांनी अनुभवावर आधारित विचार सांगताना नमूद केले की –
> “जगावं कसं मायबाप शिकवतात,
रडावं कसं अनुभव शिकवतो,
कष्ट किती करायचे हे परिस्थिती शिकवते,
आणि त्रास किती द्यायचा हे नातेवाईक शिकवतात…
पण दु:खावर मात कशी करायची हे फक्त संत शिकवतात.”
संतांचे विचार आणि गुलाबराव पाटील यांचा गौरव
कांचनताईंनी मंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष प्रशंसा करत म्हटले,
> “गुलाबराव पाटील हे केवळ मंत्री नसून सामान्य जनतेच्या मनात स्थान मिळवलेला एक देवमाणूस आहेत. पदावरून नाही, तर जनतेच्या प्रेमावरून ते मोठे झाले आहेत. गोरगरिबांच्या दुःखात सामील होणारा असा नेता विरळाच असतो.”
त्यांच्या या शब्दांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित भक्तगणांच्या टाळ्यांचा गजर उसळला आणि वातावरण अधिकच भक्तिपूर्ण झाले.
आकर्षणाचे केंद्रबिंदू
कार्यक्रमात परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला. लहान मुलांचे टाळकरी म्हणून केलेले सादरीकरण आणि भव्य मंडपातील अचूक नियोजन विशेष आकर्षण ठरले. कीर्तनानंतर झालेल्या सामूहिक भजन आणि महाआरतीने सप्ताहाचा समारोप झाला.