बातम्या

मनोज वाणींचे थेट पंतप्रधान, गृहमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र; जळगाव पोलिस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह ?

न्यायालयीन आदेश धाब्यावर; पोलिसांवर दबाव… आरोपीकडून उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचा आधार?

जळगाव, दि. १८ –जळगावातील व्यावसायिक मनोज लिलाधर वाणी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून गंभीर आरोप उघड केले आहेत.

त्यांच्या मते, संशयित आरोपी विनोद पंजाबराव देशमुख याला जिल्हा सत्र न्यायालय (वर्ग-१) तसेच उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन फेटाळलेला असूनही आजतागायत अटक करण्यात आलेली नाही. यावरून जळगाव जिल्ह्यातील पोलिसांवर दबाव असल्याचे व गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे मनोज वाणी यांनी पत्रकार परिषदेत दस्ताऐवज दाखवत सांगितले.


आरोपीवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही मोकाट

पत्रकार परिषदेत मनोज वाणी यांनी सांगितले की,

  • दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी देशमुख व इतरांनी रामदास कॉलनीतील कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकला व जीव घेण्याच्या धमक्या दिल्या.
  • या प्रकरणी दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
  • याशिवाय शहर पोलीस ठाणे व जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये दरोडा, फसवणूक, खोटी कागदपत्रे तयार करणे, लैंगिक अत्याचार, कटकारस्थान यांसह आयपीसीची गंभीर कलमे दाखल आहेत.

तरीदेखील संशयित आरोपी मोकाट फिरत असून, लोकांना धमकावत आहे, तसेच व्हॉट्सॲप गटांमधून भडकावू संदेश पसरवत आहे, असे वाणींचा दावा आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कार्यकर्ता म्हणून दबाव?

मनोज वाणी यांनी आपल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की,

  • आरोपी देशमुख स्वतःला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जिवलग कार्यकर्ता म्हणून ओळख करून देतो.
  • तो पोलिसांपासून ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयापर्यंत अधिकाऱ्यांना अजित पवारांच्या सहाय्यकांच्या नावाने फोन करून दबाव आणतो.
  • एवढेच नव्हे, तर तो उघडपणे सांगतो की, “मी एसपींसोबत बसतो, अजितदादांसोबत उभा असतो; मला कोणी अटक करू शकत नाही.”

यामुळे कायदा-सुव्यवस्थेलाच थेट आव्हान दिले जात असल्याचा गंभीर आरोप वाणी यांनी केला आहे.


न्यायालयीन आदेश फक्त कागदावरच?

मनोज वाणी यांनी दाखवलेल्या दस्ताऐवजांनुसार,

  • दि. २८ एप्रिल २०२५ रोजी उच्च न्यायालयाने रामानंदनगर पोलीस निरीक्षक व जिल्हा पोलिस अधीक्षकांना आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले व त्यांचे प्रतिज्ञापत्र नोंदवले.
  • तरीदेखील आजवर आरोपी अटकेबाहेर आहे.
  • रामानंदनगर पोलिसांनी आरोपीला फरार घोषित केले असले तरी ती कारवाई केवळ कागदापुरती राहिली आहे.
  • विनोद देशमुख गावात बिनधास्त फिरतो, अजित पवारांच्या सभांना उपस्थित राहतो, तरीही पोलिसांना तो दिसत नाही, असा आरोप वाणी यांनी पत्रकार परिषदेत केला.

पोलिसांकडून कारवाईत दुजाभाव

मनोज वाणींचे म्हणणे आहे की,

  • त्यांच्या विरोधात दाखल प्रकरणांत पोलिसांनी तात्काळ अटक करून चार्जशीट दाखल केली.
  • पण देशमुखावरील गंभीर प्रकरणांत मात्र विलंब व ढिलाई केली जात आहे.

यामुळे, “हे सर्व म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचा अपमान असून, न्याय दिरंगाई म्हणजे न्याय नाकारणे आहे. पोलीस प्रशासन न्यायालयाचा अवमान करत आहे,” असे वाणी यांनी ठणकावले.


उच्चस्तरीय चौकशीची मागणी

मनोज वाणी यांनी म्हटले आहे की –

  • आरोपी देशमुख यांच्यावर फसवणूक, चोरीचे गुन्हे दाखल असूनही अटक न झाल्याने पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
  • याशिवाय त्यांच्यावर राजकीय दबावातून अवैध सावकारीचा खोटा आरोप लावल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले.
  • या संपूर्ण प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असल्याचे ते म्हणाले.

त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात हे प्रकरण आणून दिले असून उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


मनोज वाणी यांच्या मागण्या

१. संशयित आरोपी विनोद देशमुख याला तात्काळ अटक करावी.
२. दाखल सर्व प्रकरणांचा निष्पक्ष तपास व्हावा.
३. अर्जदार व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी मिळावी.
४. राजकीय दबाव थांबवून न्यायालयीन आदेशांना अंमलात आणावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!